नीलेश राणेंचा जामीन फेटाळला
By admin | Published: May 10, 2016 02:14 AM2016-05-10T02:14:41+5:302016-05-10T02:25:40+5:30
उच्च न्यायालयाचा पर्याय : उर्वरित चौघांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
रत्नागिरी : काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत मारहाणप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी खेड येथील जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायालयाने फेटाळला. आता उच्च न्यायालयात अपील किंवा अटक, असे दोन पर्याय राणे यांच्यासमोर आहेत.
मराठा मेळाव्याला आपण उपस्थित राहिलो नाही म्हणून नीलेश राणे आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी केला होता. आपल्याला मारत मारत मुंबईपर्यंत नेण्यात आले आणि तेथेही आपल्याला मारहाण करण्यात आली, असे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार नीलेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी नीलेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने राणे यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यावरील सुनावणी ३ मे रोजी खेड येथे जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायालयात झाली होती. त्या दिवशी सादर झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने अंतिम सुनावणी सोमवारी (दि. ९) घेण्याचे आदेश दिले होते.
सोमवारी न्यायालयात या अर्जावर न्यायाधीश शेळके यांच्यासमोर सुनावणी झाली. सायंकाळी उशिरापर्यंत ही सुनावणी सुरू होती. सरकार पक्षातर्फे विनय गांधी यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. (प्रतिनिधी)
काय होऊ शकते?
अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने नीलेश राणे यांना अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पोलिस त्यांना अटक करू शकतात. कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे चिपळूणच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. अर्थात अटक होण्याआधी नीलेश राणे यांना उच्च न्यायालयात अपील करण्याचा मार्ग मोकळा आहे, अशी माहिती एका ज्येष्ठ वकिलांनी दिली.
चौघांना न्यायालयीन कोठडी
अडरे : संदीप सावंत मारहाणप्रकरणी अटकेत असलेल्या अन्य चारही आरोपींना सोमवारी चिपळूण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या मारहाण प्रकरणात सहभागी असलेले संशयित आरोपी तुषार पांचाळ, कुलदीप खानविलकर, मनीष सिंग, अण्णा ऊर्फ जयकुमार पिल्लई यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने चारही आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर करीत आहेत.