राजापुरातील आपद्ग्रस्तांना नीलेश राणे यांचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:33 AM2021-05-20T04:33:26+5:302021-05-20T04:33:26+5:30

राजापूर : तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या राजापूर तालुक्यातील आंबोळगड, जैतापूर, तुळसुंदे परिसरात मंगळवारी सायंकाळी भेट देत माजी खासदार नीलेश ...

Nilesh Rane's helping hand to the disaster victims in Rajapur | राजापुरातील आपद्ग्रस्तांना नीलेश राणे यांचा मदतीचा हात

राजापुरातील आपद्ग्रस्तांना नीलेश राणे यांचा मदतीचा हात

Next

राजापूर : तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या राजापूर तालुक्यातील आंबोळगड, जैतापूर, तुळसुंदे परिसरात मंगळवारी सायंकाळी भेट देत माजी खासदार नीलेश राणे यांनी आपद्ग्रस्तांना वैयक्तिक स्वरूपात आर्थिक मदत केली.

ज्या भागात आपल्याला पोहोचता आले नाही, त्या भागात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाऊन आपद्ग्रस्तांना मदत करावी आणि भाजप तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास द्यावा, अशा सूचना राणे यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला आहे. या आपत्तीतील आपद्ग्रस्तांना शासन आणि प्रशासनाने कोणतीही मदत केलेली नाही. या आपत्तीबाबत माहिती मिळताच नीलेश राणे सोमवारी तत्काळ मुंबईहून रत्नागिरीत दाखल झाले आणि रत्नागिरी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. अनेकांना मदतीचा हात देत आपण पाठीशी असल्याचे आश्वासनही दिले.

त्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्यांनी राजापूर तालुका दौरा करत समुद्रकिनाऱ्यालगत ज्या गावांना सर्वाधिक फटका बसला होता, त्या आंबोळगड, जैतापूर, तुळसुंदे परिसराला भेट दिली. याप्रसंगी अनेकांनी आपली कैफियत त्यांच्यापुढे मांडली. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अद्याप पंचनामे झालेले नाहीत. शासनाकडून कायमच तुटपुंजी मदत मिळते, अशा तक्रारी केल्या. यावर नीलेश राणे यांनी अनेकांना आर्थिक मदतीचा हात दिला.

याप्रसंगी राणे यांनी आंबोळगड भागातील कोसळलेल्या घरे व गोठ्यांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जैतापूर, तुळसुंंदे परिसरातही भेट दिली व तेथील आपद्ग्रस्तांशी संवाद साधत तेथील नुकसानीची पाहणी केली. ज्या भागात आपल्याला वेळेअभावी पोहोचता आले नाही, त्या भागात भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जावे आणि आपद्ग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचना राणे यांनी त्यावेळी दिल्या. जैतापूरच्या सरपंच रेखा कोंडेकर यांच्या घराचीही पाहणी केली. त्यांच्या घरावर झाड पडून त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. याप्रसंगी जैतापूरचे राष्ट्रवादीचे युवा नेते सरफराज काझी उपस्थित होते.

या दौऱ्याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, तालुका सरचिटणीस अ‍ॅड. सुशांत पवार, मच्छीमार नेते अमजद बोरकर, फय्याज नाटेकर, साखरीनाटेचे माजी सरपंच शाहादत हाबीब, अरविंद लांजेकर, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रमोद मांडवकर, सुनील खानविलकर, ज्ञानेश्वर खाडे, देवेंद्र करंगुटकर, दीपक पारकर, सावळाराम पारकर, सुनैना करगुटकर, सुनील करगुटकर, मंदार खानविलकर, श्रीपाद करंगुटकर, विश्वास करंगुटकर, दर्शना करंगुटकर, मयूरी पारकर, रेणुका पारकर, दत्ताराम वाडेकर, रूपेश पारकर, राम खडपे, पद्मनाभ मांजरेकर, विकास मांजरेकर आदींंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Nilesh Rane's helping hand to the disaster victims in Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.