बिबट्याने मारल्या नऊ शेळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:34+5:302021-06-16T04:42:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लांजा : गवाणे मावळतवाडी येथील गरीब शेतकऱ्याच्या बंदिस्त गोठ्यामध्ये शिरून एका बिबट्याने नऊ शेळ्या मारल्या. एक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लांजा : गवाणे मावळतवाडी येथील गरीब शेतकऱ्याच्या बंदिस्त गोठ्यामध्ये शिरून एका बिबट्याने नऊ शेळ्या मारल्या. एक गंभीर जखमी झाल्याने या शेतकऱ्याचे ७० हजाराचे नुकसान झाले आहे. वन विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
गवाणे मावळतवाडी येथील प्रमोद पांडुरंग करंबेळे या शेतकऱ्याने शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून शेळीपालन केले होते. त्याच्याकडे ३५ शेळ्या होत्या. घराशेजारी एका गोठ्यामध्ये शेळ्यांसाठी वेगवेगळे कप्पे तयार करून वयोमानानुसार वर्गीकरण करून ठेवण्यात येत होते. सोमवारी रात्री प्रमोद करंबेळे झोपण्यापूर्वी गोठ्यात जाऊन आले. पहाटे गोठ्याच्या वरच्या बाजूला असलेला लाकडी ओंडका बाजूला सारून बिबट्याने गोठ्यामध्ये प्रवेश केला असावा, असा अंदाज आहे. एका कप्प्यात सहा महिन्याच्या सहा शेळ्या, अडीच महिन्याच्या दोन तसेच आठ महिन्याच्या तीन अशा एकूण १० शेळ्या होत्या. त्यातील नऊ शेळ्या बिबट्याने ठार मारल्या तर एक शेळी गंभीर जखमी झाली आहे. यामध्ये सहा माद्या तर चार नर जातीच्या शेळ्या होत्या.
इतर कप्प्यांमध्ये वाघाला शिरकाव करता न आल्याने २५ शेळ्या त्याच्या तावडीतून सुरक्षित राहिल्या आहेत.
मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान प्रमोद आपल्या शेळ्यांना बाहेर सोडण्यासाठी गोठ्यात गेले. तेव्हा त्यांना गोठ्यामध्ये शेळ्या रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेल्या दिसल्या. हा प्रकार कळताच शेजाऱ्यांनी धाव घेतली. ही माहिती लांजा वन विभागाला देण्यात आल्यानंतर वनपाल दिलीप आरेकर, वनरक्षक विक्रम कुंभार, पोलीस पाटील पिंट्या कोटकर, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश करंबेळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. प्रमोद करंबेळे यांचे यात साधारण ७० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
सध्या शेतीचे दिवस असल्याने शेतीच्या कामासाठी अनेक लोकांचा बाहेर वावर असतो. अशावेळी बिबट्याच्या मुक्तसंचाराची माहिती पसरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.