Nitesh Rane: उद्धव ठाकरे सर्वात मोठे दलाल, महाराष्ट्र नको, लोकांच्या घरातील चुली पेटवा; नितेश राणेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 01:19 PM2023-05-06T13:19:04+5:302023-05-06T13:20:46+5:30
Nitesh Rane: बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून आज कोकणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा आमदार नितेश राणे आमने-सामने आले आहेत.
बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून आज कोकणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा आमदार नितेश राणे आमने-सामने आले आहेत. दरम्यान, हुकूमशाहीच्या माध्यमातून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र पेटवू असा इशार उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र नाही तर लोकांच्या घरातील चुली पेटवा, असा टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठा दलाल आज बारसू, रत्नागिरीमध्ये आला आहे, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे बारसू रिफायनरीविरोधकांची भेट घेण्यासाठी बारसूमध्ये आले असताना दुसरीकडे भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चाचे आयोजन केले. त्यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे पेटवा पेटवीची भाषा करत आहेत. पेटवा पेटवी करण्यासाठी ते बारसूत आले आहेत. महाराष्ट्र पेटवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र महाराष्ट्र नाही तर लोकांच्या चुली पेटवा. उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना बारसूमध्ये रिफायनरी झाली पाहिजे म्हणून पत्र दिलं होतं. मात्र आता ते विरोध करताहेत. हा विचार नेमका कसा बदलला. हा विचार कोकणच्या जनतेसाठी नाही, तर खिशात पैसे आले पाहिजे. मातोश्रीवर खोके आले पाहिजे म्हणून बदलला, असा आरोप नितेश राणे यांनी केला.
उद्धव ठाकरे हे सर्वात मोठे दलाल आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा दलाल आज बारसू रत्नागिरीत आला आहे. यांना मुंबई मनपाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी, परदेशात जाण्यासाठी आणि कपड्यांची खरेदी करण्यासाठी गुजराती चालतात. आणि कोकणच्या विकासावरून विनोद करतात, याचा विचार जनतेनं केला पाहिजे. उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत हे कोकणच्या विकासाला लागलेला शाप आहे. ही चपट्या पायांची माणसं कोकणात येतात आणि प्रकल्पांना विरोध करतात, असा आरोपही नितेश राणे यांनी केला.