नितीन देसाईंचे 'कोकणचे वैभव' आजही चिपळूणकरांच्या आठवणीत
By संदीप बांद्रे | Published: August 3, 2023 03:37 PM2023-08-03T15:37:26+5:302023-08-03T15:37:58+5:30
८६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी महिनाभर घेतले होते परिश्रम
संदीप बांद्रे
चिपळूण : दापोलीचे सुपुत्र, जागतिक किर्तीचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कलाकृतीमुळे राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेले जानेवारी २०१३ चे ८६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आजही चिपळूणकरांच्या स्मरणात असून देसाई यांच्या निधनानंतर त्याविषयीच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. या संमेलनासाठी महिनाभर अतिशय परिश्रमातून त्यांनी कोकणचे वैभव उभे केले होते. त्यासाठी सलग १५ दिवस चिपळूणात तळ ठोकून असलेल्या देसाई यांचा सहवास आजही अनेकांच्या आठवणीत राहिला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच येथील अनेकांच्या भावना अनावर झाल्या.
येथील लोकमान्य टिळक वाचन स्मारक मंदिराच्या पुढाकाराने शहरातील पवनतलाव मैदानात 86 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनात देखावे व प्राचीन कोकणचे वैभव दिग्ददर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला होता. संमेलनाच्या आधी महिनाभर हे काम सुरू होते. संमेलन भव्य दिव्य होण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. कोकणचे प्रतिबिंब उमटवणारी स्वागत कमान, मोठ मोठे हत्ती, भव्य रंगमंच, मंदिर, कोकणी परंपरा व कार्यक्रम प्रतिकृतीद्वारे दर्शवले होते. यातून त्यांनी आपल्या कला कौशल्याने संबंध कोकण उभे केले होते. कोकणातील जीवन पध्दती त्यांनी आपल्या कलेने जिवंत केली होती. नितीन देसाई यांच्या कला दिग्दर्शनाचे त्यावेळी अनेकांनी कौतुक केले होते. स्वागताध्यक्ष सुनिल तटकरे, माजी आमदार कै. नाना जोशी यांनीही त्यांच्या कलाकृतीला दाद दिली होती.
नितीन देसाई यांनी अत्यंत आपुलकीने साहित्य संमेलनात संमेलन नगरी सजविण्याचे काम केले होते. कोकणचे ते सुपुत्र असल्याने त्यांना कोकणविषयी आपुलकी होती, जिव्हाळा होता. अत्यंत प्रेमाने त्यांनी संमेलन नगरी उभी करण्याचे भव्यदिव्य काम केले व देशभर त्याचे कौतुक झाले. चिपळूणसारखे स्वच्छ व्यवहार मला कुठेही दिसले नाहीत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती, असे लोकमान्य टिळक वाचनालाचे तत्कालीन कार्याध्यक्ष प्रकाश देशापांडे यांनी सांगितले. स्वातंत्र दिनी दिल्लीत चित्ररथाच्या माध्यमातून नितीन देसाई यांनी महाराष्ट्राची संस्कृती जगभर पोहोचवली, असे सांगत कोकणातील एक हिरा गमावल्याची भावनाही देशापांडे यांनी व्यक्त केली. नितीन देसाई यांचे निधन अनेकांना चटका लावून गेले आणि चिपळूणमधील साहित्य संमेलनातील आठवणी जाग्या झाल्या.
देसाई यांचे नाव कलाक्षेत्रात गाजलेले असताना एक दिवस ते येथे आले आणि चिपळूणकरच झाले. मी मोठा कला दिग्दर्शक आहे, असला कसलाही आविर्भाव त्यांच्या वागण्यात नसायचा. दिवस-रात्र कामात व्यस्त असायचे. एक प्रवेशद्वार तयार झाले आणि अचानक दूरदर्शनची गाडी त्या दारातून येणार नाही, असा निरोप आला. आम्ही अस्वस्थ झालो. देसाई शांतपणे पुढे आले आणि म्हणाले, काळजी नको, गाडी मध्यरात्रीनंतर येणार आहे ना... येऊ द्या, करतो व्यवस्था. लगेच कामगार बोलावले स्वतः उभे राहून कमान उतरवली आणि गाडी सहज आत येईल, एवढी उंच केली.
या संमेलनाला खासदार शरद पवार आले असताना सुनिल तटकरे यांनी देसाई यांची खास ओळख करून दिली. एवढेच नव्हे तर त्यांची कलाकृती पाहून भरभरून दादही दिली होती. कला क्षेत्रात काम करतांना वेगवेगळ्या स्वभावाची असंख्य माणसं भेटतात. गेले महिनाभर मी तुमच्यासारख्या चांगल्या माणसांचा अनुभव बरोबर घेऊन जातोय. मी तुमचा आहे कधीही हाक मारा, निश्चित येईन. असा शब्द त्यांनी चिपळूणकरांना जाहीरपणे दिला होता. मात्र आता देसाई हाकेच्या पलिकडे गेले, चिपळूणकरांच्या मनात कायम आठवण ठेवून, अशी भावना प्रकाश देशापांडे यांनी व्यक्त केली.