भास्कर जाधव यांच्या मागणीनुसार नितीन गडकरींनी दिला निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:05+5:302021-06-11T04:22:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : आमदार भास्कर जाधव यांच्या मागणीनुसार केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : आमदार भास्कर जाधव यांच्या मागणीनुसार केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधी या योजनेतून गुहागर मतदार संघातील दोन मुख्य रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ३.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जाधव यांच्या आग्रहास्तव गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रामपूर ते उक्ताड या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच १७१ कोटी रूपये मंजूर केले. त्यानंतर लगेचच त्यांनी हा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.
चिपळूण तालुक्यातील खेरशेत - कोकरे - नायशी - कळंबुशी - पेढांबे आणि गुहागर तालुक्यातील अंजनवेल - वेलदूर - धोपावे जेट्टी ते रानवी रोड या दोन रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गडकरी यांच्याकडे केली होती. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांचा पाठपुरावा सुरू होता. या दोन्ही रस्त्यांसाठी अनुक्रमे २.७८ कोटी आणि ९६.४७ लाख रुपये इतका निधी केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधी योजनेतून उपलब्ध करून दिल्याचे पत्रच गडकरी यांनी जाधव यांना पाठवले आहे.
आमदार जाधव हे गुहागर मतदारसंघाचे आमदार होण्यापूर्वी या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असल्याने रस्त्यांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे वर्षानुवर्षे या रस्त्यांची डागडुजी वा डांबरीकरण होत नव्हते. सर्वच प्रमुख रस्ते फारच अरूंद होते. जाधव यांनी त्यांच्या मंत्री व पालकमंत्रीपदाच्या काळात जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील अनेक प्रमुख रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले. या रस्त्यांसाठी सुमारे पावणेचार कोटींचा निधी प्राप्त झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.