आधारकार्ड नाही, भिकाऱ्यांना लस देणार कशी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:06 PM2021-03-09T16:06:24+5:302021-03-09T16:19:06+5:30
Corona vaccine Ratnagiri-देशभरात कोरोना लसीकरण मोहीम आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. शहरात फिरणाऱ्या भिकाऱ्यांपासून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका आहे. मात्र, त्यांच्याकडे ओळखीचा कोणताच पुरावा नसल्याने त्यांना लस कशी देणार, हा मुख्य प्रश्न आहे. शासनाकडून याबाबत कोणतेही मार्गदर्शन अद्याप आलेले नाही.
शोभना कांबळे
रत्नागिरी : देशभरात कोरोना लसीकरण मोहीम आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. शहरात फिरणाऱ्या भिकाऱ्यांपासून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका आहे. मात्र, त्यांच्याकडे ओळखीचा कोणताच पुरावा नसल्याने त्यांना लस कशी देणार, हा मुख्य प्रश्न आहे. शासनाकडून याबाबत कोणतेही मार्गदर्शन अद्याप आलेले नाही.
आरोग्य यंत्रणेतील कोरोनायोद्धे यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात महसूल, पोलीस आणि शासकीय अधिकारी- कर्मचारी यांना लस दिली गेली. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयासह शासकीय रुग्णालयांमध्ये ही लस मोफत देण्यात येत आहे. यासाठी आधार कार्ड किंवा तत्सम पुरावे आवश्यक आहेत. परंतु ज्यांच्याकडे ओळखीचे कोणतेच पुरावे नाहीत, असे भिकारी यांना लसीकरण कसे करणार?
काही वेळा घरात ज्येष्ठ नागरिक असतात. त्यामुळे या भिकाऱ्यांना अन्नपदार्थ किंवा पैसे देताना ते बाधित होण्याचा धोका आहे. त्याचबरोबर घरातील या व्यक्तींकडून हे भिकारीही बाधित होण्याचा धोका असतो. या भिकाऱ्यांचा सर्वत्र संचार असल्याने त्यांच्या लसीकरणाचा विचार प्राधान्याने होणे गरजेचे आहे. मात्र, त्यांच्याकडे ओळखीचे कोणतेच पुरावे नाहीत, त्यामुळे त्यांना लस देण्यात अडचणी येणार आहेत. यासाठी सामाजिक संस्था आणि पोलीस यांच्या मदतीने त्यांचे ओळखपत्र तयार करून त्यांना लस द्यावी, असे काही संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून सुचविण्यात येत आहे.
शहरात फिरणारे भिकारी, मनोरूग्ण यांच्याकडे ओळखीचे कोणतेही पुरावे सापडणे अवघड असते. रेल्वेमधून किंवा काही वेळा पायी हे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. त्यामुळे या व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे या लोकांनाही कोरोना संसर्गाचा धोका असतो. तर संपर्कात येणाऱ्यांनाही या लोकांपासून धोका असतो. त्यामुळे या दोन्ही बाबींचा विचार करून अशा लोकांना लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी कुठल्या तरी सामाजिक संस्थेला पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ओळखपत्र तयार करून देण्याची जबाबदारी द्यावी.
- सचिन शिंदे,
राजरत्न प्रतिष्ठान, रत्नागिरी