पेट्रोल पंपाबाबतची वर्षभरात एकही तक्रार दाखल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:29 AM2021-03-24T04:29:33+5:302021-03-24T04:29:33+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यातील ग्राहक आपल्या हक्कांबाबत उदासीन असल्याने इथल्या ग्राहक चळवळीला म्हणावी तशी गती मिळत नाही. इतर बाबींप्रमाणेच ...
रत्नागिरी : जिल्ह्यातील ग्राहक आपल्या हक्कांबाबत उदासीन असल्याने इथल्या ग्राहक चळवळीला म्हणावी तशी गती मिळत नाही. इतर बाबींप्रमाणेच डिझेल आणि पेट्रोल वितरणाबाबतच्या हक्कांबाबतही अनभिज्ञ असल्याने पेट्रोल पंपाबाबत गेल्या वर्षभरात येथील वैध मापन केंद्राकडे एकही तक्रार दाखल नाही.
या कार्यालयाकडे गेल्या वर्षभरात केवळ पाचच तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र या तक्रारी दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या दर आणि वजनाबाबतच्या आहेत. या पाचही तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. शहरातील काही पेट्रोल पंपांवर अजूनही पेट्रोल भरताना मापात पाप केले जात असूनही त्याबाबत वाहनचालक एक ग्राहक म्हणून अजूनही अनभिज्ञ असल्याचे लक्षात येते.
या कार्यालयाकडून पेट्रोल पंपांची वार्षिक तपासणी केली जाते. कुणी तक्रार दाखल केली, तरच या कार्यालयाकडून तपासणी करून त्याबाबत कारवाई केली जाते.
पंंपावर पेट्रोल, डिझेल टाकताना घ्या काळजी
रेिडिंग झिरो आहे हे आधी पाहावे. तेल टाकत असताना काही हातचलाखी केली जात आहे का, ते पाहावे. तेल टाकत असताना लक्ष इतरत्र विचलित होऊ देऊ नये. काही शंका आल्यास प्रत्येक पंपावर पाच लिटरचे प्रमाणित माप उपलब्ध असते, त्याद्वारे खात्री करावी.
वर्षभरात केवळ ५ तक्रारी
शहरात विविध ठिकाणी एकूण पाच पेट्रोलपंप आहेत. यापैकी माळनाका परिसरातील दोन आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच एक टीआरपी येथे एक आणि मजगाव मार्गावर एक, असे एकूण पाच पेट्रोल पंप शहरात आहेत.
शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर नागरिकांची सदैव गर्दी असते. शहरातील या पाचही पेट्रोल पंपांबाबत गेल्या वर्षभरात वैध मापक कार्यालयाकडे एकाही तक्रारीची नाेंद नाही.
या कार्यालयाकडे एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधित केवळ पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारी वस्तूंच्या दराबाबतच्या आहेत. त्याही निकाली काढण्यात आल्या आहेत.
वर्षातून एकदाच होते वार्षिक तपासणी
वैध मापन कार्यालयाचे निरीक्षक वर्षातून एक वेळ पेट्रोल - डिझेल पंपाची पडताळणी करतात. तसेच वर्षभरात काही तक्रार आल्यानंतर त्याची शहानिशा करण्यासाठी या कार्यालयाकडून तपासणी होते.
या कार्यालयाकडे मेल, लेखी, फोन अथवा व्हाॅट्स ॲपद्वारे तक्रार दाखल झाल्यानंतर ती मुंबईच्या मुख्यालयात जाते. त्यानंतर ती संबंधित कार्यालयाकडे येते. त्यानंतर त्याप्रकरणी तपासणी केली जाते आणि पुढील कारवाई केली जाते.
- धुळशिंग वाघमोडे, निरीक्षक, वैध मापन कार्यालय, रत्नागिरी.