आंबा बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय नाही, रत्नागिरीत धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 02:03 PM2022-12-31T14:03:17+5:302022-12-31T14:03:48+5:30
अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान
रत्नागिरी : जिल्ह्यात आंबा बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत वेळोवेळी आंदोलने, निवेदने देऊनही अद्याप ठोस कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शुक्रवारी आंबा बागायतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना सादर करण्यात आले.
सन २०१५ पासून थकीत कर्ज असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ११,३२६ असून, थकबाकीची रक्कम २२३.८६ कोटी आहे. अशा शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आंबा, काजू बागायतदारांची संपूर्ण कर्जाची सरसकट माफी करून सातबारा कोरा करत त्यांना व्यवसायात उभे राहण्यासाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी बागायतदारांकडून करण्यात आली आहे.
सन २०१४-१५ मध्ये अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले असल्याने कर्ज नियमित न भरल्याने व्याजमाफीची मागणी करण्यात आली होती. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची व्याज माफी करण्यात आली. मात्र, शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. पुनर्गठणाची सहा टक्क्यांप्रमाणे व्याजमाफी न देता १२ टक्क्यांप्रमाणे रक्कम वसूल करून बागायतदारांवर अन्याय करण्यात आला आहे.
विद्यमान फळपीक विमा योजना सदोष असून, त्याचे निकष बदलण्याची आवश्यकता आहे. कृषी बिलामध्ये झालेली वाढ तत्काळ थांबवून पूर्वीप्रमाणे कृषी पंपाची बिल आकारणी करण्यात यावी. आंबा व काजू हे कोकणातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असून, कोकणची अर्थव्यवस्था या पिकावर अवलंबून आहे.
कोकणातील आंबा बागायतदारांची कर्जमुक्ती करून त्यांना आत्महत्या करण्यापासून वाचवावे. तसेच, ७/१२ कोरा करून शेतकऱ्यांना व्यवसायात उभे राहण्यासाठी नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. याबाबत वेळीचे योग्य निर्णय न घेतल्यास दि. २६ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. धरणे आंदोलनात रत्नागिरी जिल्हा आंबा बागायतदार संघटनेेचे अध्यक्ष प्रदीप सावंत, प्रकाश साळवी, तुकाराम घवाळी, दीपक राऊत, नंदकुमार मोहिते तसेच अन्य बागायतदार सहभागी झाले होते.