शौचालय न बांधताच पैसे खर्ची
By admin | Published: February 5, 2016 10:24 PM2016-02-05T22:24:45+5:302016-02-05T23:40:12+5:30
खेड तालुका : शिरवली ग्रामपंचायतीचा अजब प्रकार; ग्रामस्थांकडून कारभार वेशीवर
खेड : तालुक्यातील शिरवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या कारभाराची लक्तरे ग्रामस्थांनीच वेशीवर टांगल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शौचालय न बांधताच पैसे खर्ची पडल्याचा प्रकार माहितीच्या अधिकाराखाली उघड झाला आहे.
शिरवली ग्रामपंचायत ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीअंतर्गत निळवणे हे गाव आहे़ या गावातील कातळवाडीमधील ग्रामस्थांकरिता ग्रामपंचायतीने बांधलेले शौचालय अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे. माहितीच्या अधिकारात ही बाब उघड झाली असून, या प्रकाराने खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शौचालयाच्या निधीत केलेल्या घोटाळ्याप्रकरणी दोषी असणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे़
शिरवली ग्रामपंचायतीअंतर्गत निळवणे (कातळवाडी) येथील ग्रामस्थांकरिता बांधण्यात आलेले हे सार्वजनिक शौचालय सध्या अस्तित्वात नाही. मात्र, या शौचालयासाठी ३५ हजार ९८३ रूपये खर्च करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे.
गेले अनेक दिवस या शौचालयाबाबत येथील ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. खेड तालुक्यातील निळवणे (कातळवाडी) येथे सन २००७-०८ या आर्थिक वर्षात हे सार्वजनिक शौचालय मंजूर झाले होते. याकरिता ग्रामपंचायतीने ३५ हजार ९८३ रुपये खर्च देखील केले. मात्र, अद्याप या जागेवर शौचालय उभे राहिलेले नाही.
याबाबत तत्कालीन सरपंच नारायण खांबक आणि सचिव विचारे यांच्याकडे माहिती घेतली असता समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या निळवणे (कातळवाडी) येथील गंगाराम निर्मळ, बाळकृष्ण पाडावे, प्रकाश राणीम, बाळकृष्ण राणीम, काशिराम डांगे, संतोष तांबिटकर, सुरेश निर्मळ आदी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे सार्वजनिक शौचालयाच्या अस्तित्वाबाबत १७ डिसेंबर २०१५ रोजी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता. त्यावर ग्रामपंचायतीने निळवणे (कातळवाडी) ग्रामस्थांना पत्र दिले आहे़ या पत्रात सार्वजनिक शौचालयासाठी सन २००७-०८मध्ये ३५ हजार ९८३ रूपये खर्च झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शौचालय न बांधता हे पैसे परस्पर वापरण्यात आले वा कसे याबाबत आता वरिष्ठांकडे दाद मागण्यात येणार आहे. शिरवली ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत आता कोणती कारवाई केली जाणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
वरिष्ठांकडे मागणार दाद : कारवाईकडे लक्ष
शौचालय न बांधता हे पैसे परस्पर वापरण्यात आले वा कसे याबाबत आता वरिष्ठांकडे दाद मागण्यात येणार आहे. शिरवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या या भोंगळ कारभाराची लक्तरे अशी वेशीवर टांगण्यात आल्याने आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यावर काय कारवाई करतात? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
माहितीचा अधिकार
माहितीच्या अधिकारात उघड झालेली ही माहिती धक्कादायक आहे. गावातील काही ग्रामस्थांनीच हा प्रकार उघडकीला आणला आहे.