Alphonso mango: आता 'ॲमेझॉन'वर मिळणार ‘हापूस’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 02:20 PM2022-04-09T14:20:41+5:302022-04-09T14:36:22+5:30

ॲमेझॉनचे महाराष्ट्रातील चौथे तर भारतातील सातवे संकलन केंद्र आहे. बागायतदारांकडून आंबा विकत घेऊन मुंबई तसेच पुण्यातील ॲमेझॉनच्या ग्राहकांना पोहाेचवला जाणार आहे.

No need to go to the market to buy Hapus Mango, now you will get Hapus on Amazon | Alphonso mango: आता 'ॲमेझॉन'वर मिळणार ‘हापूस’

Alphonso mango: आता 'ॲमेझॉन'वर मिळणार ‘हापूस’

googlenewsNext

रत्नागिरी : ऑनलाईन खरेदी-विक्रीमध्ये अग्रेसर असणाऱ्या ‘ॲमेझॉन’ कंपनीने आता आंबा खरेदीला प्रारंभ केला आहे. कंपनीतर्फे शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसीमध्ये आंबा संकलन केंद्र सुरू केले आहे. सुरुवातीला १२ शेतकऱ्यांकडून ६०० डझन आंब्याची खरेदी करण्यात आली आहे. १८५ ते २२० ग्रॅमपर्यंतचा पिकलेला हापूस आंबा प्रति डझन ९०० रुपयांनी खरेदी करण्यात येत आहे.

रत्नागिरीतील आंबा संकलन केंद्राचे उद्घाटन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, आंबा बागायतदार समीर दामले, प्रमुख व्यवस्थापक राजेश प्रसाद, विवेक धवन, सुजय हेगडे, नरेंद्र जवळ यांच्यासह बागायतदार उपस्थित होते. ॲमेझॉनचे महाराष्ट्रातील चौथे तर भारतातील सातवे संकलन केंद्र आहे.

बागायतदारांकडून आंबा विकत घेऊन मुंबई तसेच पुण्यातील ॲमेझॉनच्या ग्राहकांना पोहाेचवला जाणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर परदेशात आंबा निर्यातीचा मानस असल्याचे सांगितले. आंबा खरेदी केल्यानंतर बागायतदाराला त्वरित पैसे दिले जाणार आहेत. आंबा बागायतदार राजेश पालेकर यांच्या सूचनेनुसार पुढील आठवड्यापासून लहान आकाराचाही आंबा खरेदी केली जाणार आहे.

आंबा संकलन केंद्राच्या उद्घाटनानंतर मिलिंद जोशी यांनी मार्गदर्शन करताना, कोरोनामुळे बागायतदार दलालावर अवलंबून न राहता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वत:च विक्री सुरू केली आहे. ॲमेझॉनसारख्या कंपन्या थेट विक्रीसाठी येऊ लागल्यामुळे शेतकऱ्याला दर ठरवता येणार असून, ही एक नवी संधी आहे, असे सांगितले.

समीर दामले यांनी मनोगत व्यक्त करताना बागायतदार पूर्वी दलालावर अवलंबून असल्याने दलाल सांगेल तोच दर ठरवला जात हाेता; मात्र आता कंपनी थेट खरेदी करत असल्याने दर चांगला प्राप्त होणार आहे. शिवाय जीआयमुळे (भौगोलिक मानांकन) गुणवत्तेला प्राधान्य मिळणार असल्याचे सांगितले.

ॲमेझॉनच्या माध्यमातून हापूसला चांगला दर मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. शिवाय बागायतदारांना गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी आवश्यक खते, औषधे, साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ॲप विकसित केले जाणार आहे. याबाबत वेगळ्या पद्धतीने काम करण्याचे उद्दिष्ट आहे. हापूसची खरेदी हे ध्येय न ठेवता शेतकऱ्यांच्या हितार्थ विचार सुरू आहे. - राजेश प्रसाद, प्रमुख व्यवस्थापक, ॲमेझॉन

Web Title: No need to go to the market to buy Hapus Mango, now you will get Hapus on Amazon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.