रत्नागिरी वगळता महायुतीचे संबंध चांगले, शिंदेसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलं मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 13:30 IST2024-09-23T13:29:38+5:302024-09-23T13:30:43+5:30
महायुतीचे सरकार सत्तेत नक्की येईल

रत्नागिरी वगळता महायुतीचे संबंध चांगले, शिंदेसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलं मत
रत्नागिरी : शरद पवार आणि अजित पवार अशी तुलनाच करता येणार नाही. शरद पवार हे अनुभवी आणि मुरब्बी राजकारणी आहेत. ते शांत राहून काय करतील हे कोणालाच कळणार नाही. त्यामुळे शरद पवार हे राजकारणात आजही सरस आहेत, असे प्रतिपादन काे-ऑपरेटिव्ह बँकस् एम्प्लाॅईज युनियनचे अध्यक्ष तथा शिंदेसेनेचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी रत्नागिरी येथे केले.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल को-ऑपरेटिव्ह बॅंकस् एम्प्लॉईज युनियनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आनंदराव अडसूळ म्हणाले, मतदारसंघातील जागेबाबत दावे-प्रतिदावे हाेतच राहणार, त्याबाबत याेग्य ताे ताेडगा वरिष्ठ काढतात.
राज्यात रत्नागिरी वगळता महायुतीचे सर्वत्र चांगले संबंध आहेत. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार चांगले काम करत आहे. भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी महायुतीमध्ये चांगले संबंध आहेत. प्रत्येक जण जागांसाठी दावा करणार; परंतु शेवटी निर्णय हे वरिष्ठच घेतील. महायुतीचे सरकार सत्तेत नक्की येईल.
ते म्हणाले की, युनियनच्या वार्षिक सभेत कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांचे जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा बँकेला ५५ कोटींचा नफा झाला आहे. हा नफा आणखी कसा वाढेल, यासाठी काम करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेची कर्मचारी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच निवड प्रक्रिया सुरू होणार असल्याचे अडसूळ यांनी सांगितले.