ठेकेदारांअभावी पाणी योजना रखडल्या-- निविदांना तीन वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदार मिळेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 02:33 PM2019-04-12T14:33:17+5:302019-04-12T14:35:21+5:30
तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांच्या कामांच्या निविदांना तीन वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरविली़ त्यामुळे तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा
रत्नागिरी : तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांच्या कामांच्या निविदांना तीन वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरविली़ त्यामुळे तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा योजनांची कामे फक्त कागदावरच राहणार असून, कोट्यवधी रुपयांचा निधीही पडून राहणार आहे़
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा योजनांच्या लाखो रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या़ प्रत्येक गावातील वाडी - वस्त्यांमधील घरापर्यंत पाणी यावे, यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करुन पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत़ त्यामध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, जलयुक्त शिवार, विंधन विहिरी व अन्य योजनांचा समावेश आहे.
ग्रामीण भागामध्ये अनेक गावातील वाड्यांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येक वर्षी पाणीटंचाई सुरु असते. ही टंचाई निवारण्यासाठी टंचाई कार्यक्रम तसेच देखभाल दुरुस्तीची कामे, आमदार निधीतून पाणी पुरवठ्याची कामे घेण्यात येतात़ रत्नागिरी तालुक्यामध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाची २४ कामे, टंचाई कार्यक्रमांतर्गत २५ कामे, जलयुक्त शिवारची १७ कामे, देखभाल दुरुस्ती व आमदार निधीतून २० कामे अशी पाणी पुरवठ्याची कामे तालुक्यात करण्यात येणार आहेत़
यापैकी काही कामांसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून निविदा काढण्यात आल्या होत्या़ मात्र, या निविदा स्वीकारण्यास कोणीही ठेकेदार पुढे येत नसल्याने पाणी पुरवठा विभागाची मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणी पुरवठ्याची कामे कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे़
या कामांच्या निविदांना तीन वेळा मुदतवाढ देऊनही ती घेण्यासाठी ठेकेदारांनीच पाठ फिरविण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कामे केल्यावर कामांची रक्कम वेळेवर मिळत नाही वा अन्य कोणती कारणे आहेत का, अशी चर्चा सुरु झाली आहे़ या कामांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.