एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, नारायण राणेंनी जनतेला दिले आश्वासन
By संदीप बांद्रे | Published: April 16, 2024 01:12 PM2024-04-16T13:12:38+5:302024-04-16T13:15:18+5:30
चिपळूण : सिंधुदुर्गात येऊन एकदा पहा, विकास कसा असतो ते पाहायला मिळेल. असाच बदल रत्नागिरीत घडवायचा असेल तर खासदार ...
चिपळूण : सिंधुदुर्गात येऊन एकदा पहा, विकास कसा असतो ते पाहायला मिळेल. असाच बदल रत्नागिरीत घडवायचा असेल तर खासदार म्हणून निवडून द्या, तुमचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, निवडणुकीनंतर दोन महिन्यात महत्त्वाचे प्रश्न सुटलेले असतील, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळुणात आश्वासन दिले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील राधाताई लाड सभागृहात महायुतीचा महामेळावा पार पडला. या मेळाव्यात राणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याचा विकास करण्याचा आपला मानस आहे. उद्योग खात्याचा मंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना रोजगाराची संधी मिळवून देण्याचे काम झाले आहे. इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, यासाठी उद्योग आले पाहिजेत. चिपळूणमध्ये विमानतळ होण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न राहतील, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. देशाला विकासाच्या दिशेने नेण्याचे मोठे काम केले आहे. भारत अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हॅट्ट्रिक करण्यासाठी तुम्ही सर्वांनी साथ द्या, असे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार मधुकर चव्हाण, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, राष्ट्रवादी काँग्रेस चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, युवक तालुका अध्यक्ष नीलेश कदम, भाजपा प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष चित्रा चव्हाण, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहर मंडल अध्यक्ष श्रीराम शिंदे, खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, आशिष खातू, खेर्डीचे माजी उपसरपंच विनोद भुरण, स्नेहा मेस्त्री, मनसे माजी चिपळूण तालुकाध्यक्ष राजेंद्र राजेशिर्के, भाजपा कामगार मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विनोद कदम, सचिन शिंदे उपस्थित होते.