रत्नागिरीत गेली तीन वर्षे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच नाही!
By admin | Published: April 1, 2017 12:44 PM2017-04-01T12:44:32+5:302017-04-01T12:44:32+5:30
पालक व विद्यार्थ्यांची तीव्र नाराजी
आॅनलाईन लोकमत
शिरगांव (रत्नागिरी), दि. १ : समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती गेली तीन वर्ष विद्यार्थ्यांना पोहचलीच नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केंद्र सरकारची योजना राज्य शासनाचे शालेय शिक्षण विभागाने अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्याकडे अधिकार दिलेले आहेत. मात्र शिष्यवृत्ती का मिळत नाही? याचे उत्तर मात्र माध्यमिक विभागाकडे नाही.
आठवीतल्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतच्या शिक्षणाला आर्थिक मदत प्रतिमाह ५०० रुपये देण्याची तरतूद आहे. मात्र पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ठरवूनच पाल्याला शिष्यवृत्ती परिक्षेला बसू दिले जाते. एन.एम.एम.एस. असे या परिक्षेचे नाव असून अधिक जोमाने अभ्यास करुन गरीब विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जातात. संस्थाही त्यांना प्रवत्त करतात. मात्र ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमाच होत नसल्याने जिल्ह्यातील पालकांनी शिक्षण विभागाकडे संपर्क साधला असता याबाबतची माहिती पुन्हा नव्याने जमा करण्यात येत आहे. रेकॉर्ड हरवले आहे. बँकेत आधारकार्ड लिंक करा अशा सूचना गेले वर्षभर येत आहेत.
संबंधित विविध प्रशालेत जावून चौकशी करता याबाबत जिल्हा शालेय शिक्षण विभागाने वेगवेगळ्या पद्धतीने चार वेळा रेकॉर्ड घेतले आहे. आम्ही केवळ त्यांच्या आदेशाने परिपत्रकनिहाय काम करतो असे सांगण्यात आले. या गोंधळात पालक व विद्यार्थ्यांनी शासनाच्या धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)