आरोग्य विभागाकडून अधिकृत माहिती येईपर्यंत कुठल्याही स्टेनचे नाव देऊ नये : लक्ष्मीनारायण मिश्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:21 AM2021-06-22T04:21:45+5:302021-06-22T04:21:45+5:30
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील काही गावे प्रतिबंध करण्यात आली आहेत. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट या नव्या स्टेनचा समावेश ...
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील काही गावे प्रतिबंध करण्यात आली आहेत. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट या नव्या स्टेनचा समावेश असलेला कोणताही रूग्ण अद्याप आढळलेला नाही. याबाबत कुठलाही निष्कर्ष समोर येईपर्यंत, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अधिकृत माहिती येईपर्यंत दुसरे नाव देता येणार नाही, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी आयोजित केलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे नऊ रुग्ण सापडले असून त्यापैकी महाराष्ट्रात सात रुग्ण आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पाच आणि नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात एक-एक रुग्ण असल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर, तसेच वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तांबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेथील सुमारे ५२०० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ५० ते ५२ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. अजूनही काही १०० जणांचे नमुने नुकतेच पाठविण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल आल्यावर हा कोरोनाचा कुठला स्टेन आहे, हे समजेल. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून अधिकृत कुठलीच माहिती येत नाही. ताेपर्यंत कुणीही गैरसमज पसरवू नयेत.
कोरोनाचे भागात परदेशातून आलेले नऊ रुग्ण सापडले आहेत. मात्र, ते बरे होऊन त्यांच्या घरीही गेले आहेत. जिल्हाधिकारी म्हणाले की, प्रत्येक महिन्याला कोरोनाचे म्युटेशन बदलत असते. त्यामुळे त्यावर संशोधन सुरू आहे. यादृष्टीने संगमेश्वर तालुक्यात परदेशातून आलेल्या लोकांमुळे खबरदारी म्हणून वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारी संगमेश्वर बाजारपेठही बंद ठेवण्यात आली आहे. सतर्कतेसाठी कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. कोरोना चाचणीसाठी ९ मोबाईल पथके कार्यरत आहे. चाचण्या वाढविल्या आहेत. काॅन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविले आहे. मागच्या सात दिवसांत पाॅझिटिव्हिटीचा कमी झालेला दर पाहता कोरोना वाढण्याची शक्यता वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती दिली जात नाही, तोपर्यंत कुठलेही नकारात्मक वृत्त पसरवू नये. याबाबत राज्य शासनाकडून अधिकृत माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे नकारात्मक वृत्ते पसरवून लोकांना पॅनिक करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी या ऑनलाईन पत्रकार परिषदेत केले.