गणपतीपुळेत ‘नो स्वीमिंग झोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:33 AM2021-09-25T04:33:14+5:302021-09-25T04:33:14+5:30

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथे बुडून मृत्यू हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटना वारंवार घडू नयेत, यासाठी पोहण्यास ...

'No swimming zone' in Ganpatipule | गणपतीपुळेत ‘नो स्वीमिंग झोन’

गणपतीपुळेत ‘नो स्वीमिंग झोन’

Next

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथे बुडून मृत्यू हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटना वारंवार घडू नयेत, यासाठी पोहण्यास धोकादायक असलेल्या दोन ठिकाणी लाल रिबिन लावून ‘नो स्वीमिंग झोन’ बनविण्यात आले आहेत. भरतीवेळी पाण्यात चाळ तयार होते आणि त्यात पर्यटक अडकून बुडतात. पोहणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे झोन बनवले असून, गणपतीपुळे ग्रामपंचायतीतर्फे किनाऱ्यावर दहा जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोनामुळे सध्या मंदिरे बंद आहेत. यामुळे गणपतीपुळेतील पर्यटनाला खीळ बसली असली तरीही काही पर्यटकांचा राबता सुुरु आहे. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या पाण्यात पाेहण्याचा माेह आवरता येत नाही. मात्र, पाण्याचा अंदाज येत नसल्याने पर्यटक बुडण्याचे प्रमाण वाढत आहे. काेराेनामुळे पर्यटकांची संख्या कमी असल्याने बुडणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, सहा दिवसांपूर्वी सांगलीतील एका पर्यटकाचा गणपतीपुळे किनारी बुडून मृत्यू झाला तर एकाला जीवरक्षकांनी वाचवले. या घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जयगड पोलीस स्थानक, गणपतीपुळे ग्रामपंचायत आणि देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर दोन दिवसात उपाय केले गेले. भरती-ओहोटीच्या वेळेनुसार समुद्रात खड्डा तयार होतो आणि त्यात पर्यटक सापडल्यास दुर्घटना घडते. सर्वसाधारणपणे हे प्रकार मंदिराच्या समोरील शंभर मीटरच्या भागात घडतात. तेथे लाल झेंडे रोवून रिबिन्स लावण्यात आल्या आहेत. किनाऱ्यावरील वॉच टॉवरजवळही असे प्रकार होतात. तो भागही ‘नो स्विमिंग झोन’मध्ये समाविष्ट केला आहे. तसेच एटीडीसीच्या मागील बाजूलाही या पध्दतीने झोन बनविण्यात येणार आहे.

चाळ तयार होण्याची ठिकाणे बदलत असल्याने ‘नो स्विमिंग झोन’ बदलतात. ती जबाबदारी जीवरक्षकांवर सोपवली आहे. सोमवार, दि. २० राेजी सकाळी साडेनऊ वाजण्यापूर्वी झेंड रोवले होते, त्याच्या बाजूला काही अंतरावर खड्डा पडला. ही बाब जीवरक्षकांच्या लक्षात आली होती. सुदैवाने पर्यटकांची संख्या कमी असल्याने त्या भागात कोणीच पोहायला गेलेले नव्हते. भविष्यात एकाही पर्यटकाचा बुडून मृत्यू होणार नाही, याची काळजी पोलीस, ग्रामपंचायत आणि देवस्थानतर्फे घेण्यात येत आहे. त्यासाठी दोन शीफ्टमध्ये दहा जीवरक्षक नेमले आहेत.

--------------------

बाेटींग सेवा बंदच

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील बोटींग सेवा सुरु होईपर्यंत जीवरक्षकांना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे. बोटींग सुरु झाले की, बुडणाऱ्यांना आपसूकच मदत मिळते. सध्या समुद्र खवळलेला असल्याने आणि कोरोना परिस्थितीमुळे बोटींग सेवा बंद ठेवण्यात आली आहे. ही बाेटींग सेवा सुरु हाेईपर्यंत जीवरक्षकांना दक्ष राहावे लागणार आहे.

Web Title: 'No swimming zone' in Ganpatipule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.