त्यांना विचार नाही, बाळासाहेबांचे पैसे हवे होते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सणसणीत टीका
By मनोज मुळ्ये | Published: January 8, 2024 03:16 PM2024-01-08T15:16:23+5:302024-01-08T15:18:37+5:30
'शिवसेनेच्या खात्यात असलेले ५० कोटी रुपये त्यांना हवे होते'
राजापूर : आमदार, खासदारांसह अनेकजण आमच्या मूळ शिवसेनेत आहेत. धनुष्यबाणही आपल्याकडेच आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी ही भूमिका घेतली. पण त्यांना बाळासाहेबांचे विचार नको होते. त्यांना बाळासाहेबांचे पैसे हवे होते. शिवसेनेच्या खात्यात असलेले ५० कोटी रुपये त्यांना हवे होते, अशी सणसणीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
राजापूरमध्ये आयोजित शिवसंकल्प मेळाव्यात ते बोलत होते. अब की बार ४५ पार अशी घोषणाही त्यांनी केली. या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अनेकदा टीका केली.
बाळासाहेब म्हणायचे, मला एक दिवस पंतप्रधान करा, मी अयोध्येत राममंदिर बांधणे आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवणे हे दोन निर्णय लगेच घेईन. आता हे दोन्ही निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले आहेत. आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींची पाठ थोपटली असते. कौतुक केले असते. पण आता तसे होत आहे का? बाळासाहेबांचे स्वप्न ज्यांनी पूर्ण केले, त्यांच्यावर टीका करायचे काम सुरू आहे. टिंगल केली जात आहे.
मंदिर वही बनाएंगे, लेकीन तारीख नही बताएंगे अशी चेष्टा करणार्यांना मोदींनी ते करुन दाखवले आहे आणि तारीखही सांगितली आहे. आता ते कॅलेंडर घेऊन तारीख शोधत बसले असतील, असा टोलाही शिंदे यांनी हाणला. ज्यांनी मंदिर बांधले त्यांच्यासोबत तुम्ही राहणार की जे मंदिरावरुन टिंगल करत आहेत, त्यांच्याबरोबर राहणार, असा प्रश्नही त्यांनी केला.
केंद्र सरकारकडून राज्याला प्रत्येक योजनेसाठी निधी दिला जात आहे. याआधी अडीच वर्षे अहंकारापोटी केंद्राकडे निधी मागितलाच गेला नाही. त्यामुळे राज्य विकासात बरेच मागे गेले. जर आम्ही सत्तांतराचा निर्णय घेतला नसता तर राज्य कुठे गेले असते, असा प्रश्न करताना शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. जगभरात भारताला आदर मिळवून देण्याचे आणि भारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम मोदी यांनी केले आहे, असे ते म्हणाले.
उद्योगमंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याला चांगली साथ दिली आहे. त्यांनी गेल्या दीड वर्षात भरीव काम केले आहे. आधीच्या अडीच वर्षात परदेशी गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र मागे पडला होता. मात्र उदय सामंत यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे गेल्या दीड वर्षात खूप मोठी गुंतवणूक राज्यात झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा वर आला आहे, असेही ते म्हणाले.