वरिष्ठ डॉक्टर्सचा असहकार; रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:04 PM2019-03-06T12:04:40+5:302019-03-06T12:08:21+5:30
वरिष्ठ डॉक्टरांच्या जाचाला कंटाळून ५ नवीन डॉक्टर्सनी राजीनामा दिला असून, १८ फेब्रुवारीला १ महिन्याची नोटीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे दिली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नवीन डॉक्टर्स व जुने डॉक्टर्स यांच्यातील वाद उफाळून आला. स्वतंत्र काम न पाहणाऱ्या नवीन डॉक्टर्सना काढून टाका, असा आग्रह धरीत वरिष्ठ डॉक्टर्सनी वैद्यकीय सेवा न देता असहकार पुकारला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयच व्हेंटिलेटरवर आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या जाचाला कंटाळून ५ नवीन डॉक्टर्सनी राजीनामा दिला असून, १८ फेब्रुवारीला १ महिन्याची नोटीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे दिली आहे.
जिल्हा रुग्णालयात आधीच नवीन डॉक्टर्स येत नाहीत. असे असताना खासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या शासनाकडील पाठपुराव्याने जिल्हा रुग्णालयात २०१६ मध्ये ९ नवीन डॉक्टर्स रूजू झाले. त्यामधील ४ डॉक्टर्स स्वतंत्रपणे काम करतात.
५ नवीन डॉक्टर्स रुग्णालयात वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय सेवा देतात. मात्र, ते स्वतंत्र जबाबदारी घेण्यास घाबरतात. त्यांनी स्वतंत्रपणे काम करावे, असा हट्ट काही वरिष्ठ डॉक्टर्सनी धरला आहे. तसे जमत नसल्यास त्यांना काढून टाकावे, अशी मागणी त्या वरिष्ठ डॉक्टर्सनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे केली आहे. वरिष्ठ डॉक्टर्सच्या हट्टामुळे व नवीन डॉक्टर्सनी दिलेल्या राजीनामा नोटीसमुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फुले यांची कोंडी झाली आहे.
रुग्णालयातील काही वरिष्ठ डॉक्टर्सकडे अपघात आणि स्पेशालिटी विभागाची जबाबदारी दिल्याने त्यांच्यावर कामाचा ताण पडत असल्याचे या डॉक्टर्सचे म्हणणे आहे.
वरिष्ठ डॉक्टर्सचा जाच होत असल्याचे सांगत ९पैकी ५ नवीन डॉक्टर्सनी १८ फेब्रुवारीलाच आपल्या राजीनाम्याची नोटीस जिल्हा शल्यचिकित्सकांकडे दिली आहे. त्याला महिना पूर्ण व्हायचा आहे. सध्या ते डॉक्टर्स रुग्णालयात कार्यरत आहेत. असे असताना त्यांना काढून कसे टाकणार, असा सवाल डॉ. फुले यांनी वरिष्ठ डॉक्टर्सना केला आहे.
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे आधीचे जिल्हा चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांच्यावर दीड महिन्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई झाली. त्यानंतर डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. गेल्या महिनाभरात जिल्हा रुग्णालयातील कामकाज योग्यरित्या चालविण्याचा प्रयत्न डॉ. फुले यांनी केला आहे.
आता त्यांच्यासमोर नवीन डॉक्टर्स व जुने डॉक्टर्स असा वाद काहीजणांकडून निर्माण करण्यात आल्याची चर्चा रुग्णालय परिसरात आहे. डॉ. फुले यांच्या जिल्हाचिकित्सक म्हणून नियुक्तीलाच हे अप्रत्यक्ष आव्हान असल्याची चर्चा सुरू असून, यामागील सूत्रधाराच्या नावाचीही चर्चा होत आहे.
आमदार उदय सामंत मार्ग काढणार?
नव्या-जुन्या डॉक्टर्सच्या कलहामध्ये रुग्णालयातील वैद्यकीय सेवेवर गंभीर परिणाम झाला आहे. याप्रकरणी मार्ग काढण्यासाठी ७ मार्च रोजी आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत रुग्णालयात बैठक होणार असल्याची माहिती डॉ. फुले यांनी दिली आहे.
वाद तातडीने मिटवावेत...
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्समध्ये सुरू असलेले वाद व त्यामुळे रुग्णसेवेवर झालेला गंभीर परिणाम पाहता हे वाद तातडीने मिटवावेत. त्यासाठी लोकप्रतिनीधी, जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.