नोटाबंदीमुळे प्रचाराचा बेरंग

By admin | Published: November 18, 2016 11:16 PM2016-11-18T23:16:09+5:302016-11-18T23:16:09+5:30

नगर परिषद निवडणूक : धनटंचाईने उमेदवार बेजार; कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

Non-voting campaign | नोटाबंदीमुळे प्रचाराचा बेरंग

नोटाबंदीमुळे प्रचाराचा बेरंग

Next

 
प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी
जिल्ह्यातील चार नगर परिषदा व एका नगरपंचायतीसाठी येत्या २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र, ८ नोव्हेंबरला केंद्राने लागू केलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटाबंदीमुळे निवडणुकीसाठी खेळते भांडवल म्हणून वापर होणाऱ्या पैशांची मोठी टंचाई निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांना जाणवत आहे. त्यामुळे प्रचारासाठी पुरेसा पैसा खर्च करणे अशक्य झाल्याने प्रचाराचा बेरंग झाला आहे.
निवडणुकीसाठी प्रत्येकवेळी निवडणूक आयोगाकडून उमेदवारांच्या निवडणूक खर्चाला मर्यादा घातली जाते. यावेळीही ब वर्ग नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगरसेवकपदाच्या उमेदवाराला दोन लाख तर क वर्ग नगर परिषद उमेदवारासाठी हीच मर्यादा दीड लाख रुपये ठेवण्यात आल आहे. ब वर्ग नगर परिषदांमधील नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला निवडणूक खर्च मर्यादा साडेसात लाख रुपये तर क वर्ग नगराध्यक्षपद उमेदवारासाठी पाच लाख रुपये खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे. प्रत्यक्षात अशी मर्यादा असूनही निवडणुकीवर होणारा खर्च अमर्यादित असल्याचीच चर्चा होते.
जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर, चिपळूण व खेड या नगर परिषदा तसेच दापोली नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. चारही नगर परिषदांसाठी थेट नगराध्यक्षपदाची निवडणूकही होणार आहे. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी करण्यात आली होती. तसेच महिनाभरापूर्वीच निवडणुकीसाठी लागणाऱ्या धनाची सज्जताही ठेवण्यात आली होती. मात्र, ८ नोव्हेंबरला मोदी सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यामुळे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नगरसेवकपदाच्या व नगराध्यक्षपदाच्या सर्वच उमेदवारांची आर्थिक कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जुन्या नोटा बॅँकांमधून जमा करूनही फारशी मोठी रक्कम हाती लागत नसल्याने उमेदवारांची मोठी पंचाईत झाली आहे. त्यातून मार्ग काढऱ्यासाठी गेल्या आठवडाभरात जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, त्यातून फारसे काही हाती लागलेले नसल्याने प्रचारासाठी रोजच्या रोज कार्यकर्त्यांची जमवाजमव करणे उमेदवारांना कठीण बनले आहे. सुरुवातीला उमेदवारांबरोबर प्रत्येक वॉर्डमध्ये प्रचारासाठी फिरताना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत असे. मात्र, आता घरोघरी प्रचार करताना काही उमेदवारांबरोबर केवळ दोन-चार कार्यकर्तेच दिसून येत आहेत. प्रचार कार्यालयामध्येही कार्यकर्त्यांची वर्दळ कमी झाली आहे.
काही उमेदवार, राजकीय नेत्यांकडील हुकमी काम करणारे कार्यकर्ते सध्या नोटा बदलासाठी बॅँकांच्या रांगांमध्ये उभे राहात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रचारासाठी पैशांच्या टंचाईमुळे कार्यकर्त्यांची टंचाई ही गंभीर समस्या बनली आहे. अनेकांनी प्रचारातून अंग काढून घेतल्याने सर्वच पक्ष अडचणीत आले आहेत. एकूणच नोटाबंदीमुळे प्रचाराचा बेरंग झाला असून, येत्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत नोटाबंदीमुळे काय होणार, याबाबत सर्वजण धास्तावले आहेत.
बाद नोटांचा पाऊस!
नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर भांबावलेल्या स्थितीत असलेल्या काही राजकीय नेत्यांनी, उमेदवारांनी त्यांच्याकडील बंद झालेल्या पाचशे व हजारच्या नोटांचे वाटप केल्याची चर्चाही जोरात आहे. परंतु, या नोटा त्या कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना बदलून मिळाल्या की नाही, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. नोटांचा पाऊस पडूनही कार्यकर्ते मात्र प्रचारात नाहीत, असे चित्र आहे.
राजकीय नेत्यांचे कार्यकर्तेही नोटा बदलण्यासाठी, बॅँकेत भरण्यासाठी रांगेत.
जुन्या नोटा जमा करूनही मोठी रक्कम हाती नाहीच.
थेट नगराध्यक्षपदाच्या सर्वच उमेदवारांची नोटाबंदीमुळे आर्थिक कोंडी.
प्रचार कार्यालयात वर्दळ कमी.

Web Title: Non-voting campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.