रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारांमध्ये लढत, एकाचीही माघार नाही
By शोभना कांबळे | Published: April 22, 2024 05:10 PM2024-04-22T17:10:39+5:302024-04-22T17:14:11+5:30
छाननीअंती सर्व अर्ज वैध
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी ९ उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले होते. ते सर्व अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी, सोमवारी ९ पैकी एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने हे सर्वच उमेदवार आता निवडणुकीत लढत देणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत, महायुतीचे उमेदवार नारायण राणे, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र आयरे, सैनिक समाज पक्षाचे सुरेश शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे मारुतीकाका जोयशी, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक पवार आणि शकील सावंत, अमृत तांबडे, विनायक लहू राऊत हे तीन अपक्ष उमेदवार असे मिळून एकूण नऊ उमेदवारांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अर्ज सादर केले होते.
उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी चार अर्ज तर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी दोन अर्ज तसेच अन्य उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. छाननीअंती हे सर्व अर्ज वैध ठरल्याने नऊ जणांची उमेदवारी अधिकृत झाली.
आज, सोमवारी (दि.२२) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. परंतु या उमेदवारांपैकी कुणीही माघार घेतली नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात हे नऊही उमेदवार लढत देणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.