नारायण राणे यांना उमेदवार म्हणून गणतीत धरत नाही : विनायक राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 11:51 AM2024-04-06T11:51:42+5:302024-04-06T11:52:03+5:30
चिपळूण (जि. रत्नागिरी ) : एकवेळ किरण सामंत उमेदवार म्हणून समोर असते तर मी ते आव्हान म्हणून समजू शकलो ...
चिपळूण (जि. रत्नागिरी) : एकवेळ किरण सामंत उमेदवार म्हणून समोर असते तर मी ते आव्हान म्हणून समजू शकलो असतो. परंतु, नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीसाठी मी गणतीतच धरत नाही. सुदैवाने ते उमेदवार म्हणून समोर येणार असल्याने मला विजयाची हॅटट्रिक साधण्याची आणि त्यांना पराभवाची हॅटट्रिक करण्याची संधी चालून आली आहे, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी टोला हाणला.
कापसाळ येथे महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा झाला. निवडणुकीसाठी प्रतिस्पर्धी तगडा उमेदवारच अद्याप मैदानात उतरलेला नाही. किरण सामंत उमेदवार असते, तर काहीसे आव्हान निर्माण झाले असते. मात्र, राणे यांच्यामुळे विजयाचा मार्ग सोपा झाला आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा महाराष्ट्रावरील राग अजूनही गेलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. त्या पद्धतीने महाराष्ट्र लुटण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. परंतु, महाराष्ट्राची जनता तो यशस्वी होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
आता कोकणात सिडको आणून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा डाव आहे. याबाबतच्या अध्यादेशाला आपण विरोध केला. परंतु, मिंधे सरकारचे जिल्ह्यातील मंत्री त्यावर बोलायला तयार नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.