सत्तेच्या मोहासाठी नाही, बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी सत्तांतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
By मनोज मुळ्ये | Published: January 8, 2024 03:08 PM2024-01-08T15:08:34+5:302024-01-08T15:09:24+5:30
राजापूर : आम्हाला सत्तेचा मोह नाही. पण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली जात होती. म्हणूनच आम्ही ठाम भूमिका घेतली आणि ...
राजापूर : आम्हाला सत्तेचा मोह नाही. पण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली जात होती. म्हणूनच आम्ही ठाम भूमिका घेतली आणि राज्यात सत्तांतर झाले, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. राजापूरमध्ये आयोजित शिवसंकल्प मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
कोकणाने आजवर शिवसेनेवर आणि बाळासाहेबांवर खूप प्रेम केले. त्यामुळे कोकणातील लोकांशी संवाद साधताना नेहमीच आनंद होतो. शिवसेनेसाठी मुंबई, ठाणे हे हृदय असेल तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे शिवसेनेचे फुफ्फुस आहे. कोकणाने शिवसेनेला नेहमीच ऑक्सिजन दिला आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
राज्यात झालेल्या सत्तांतराचा निर्णय सत्तेसाठी घेतला नव्हता. रोज सावरकरांचा अपमान होत होता. बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान होत होता. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली. ५० आमदार आणि १३ खासदारांनी त्यासाठी साथ दिली. अनेक नेते, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, कार्यकर्ते आमच्यासोबत आले. अजूनही येत आहेत. जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर हे सर्वजण आमच्यासोबत आले असते का, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
बाळासाहेबांनी नेहमी कार्यकर्त्यांना मोठे केले. त्यांच्या विचारांना ज्यांनी टाळले, त्यांचे काय झाले हे तुम्ही पाहिलेच असेल. अशा विघ्नसंतोषी, हिंदुत्त्वाला विरोध करणार्यांचा या निवडणुकीत नायनाट करुन टाकूया, असे आवाहनही त्यांनी केले.