Bhaskar Jadhav: ‘नाॅट रिचेबल’ आमदार भास्कर जाधव चिपळुणात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 12:54 PM2022-06-24T12:54:20+5:302022-06-24T12:54:59+5:30
नेटवर्क नसल्याने आपला फाेन ‘नाॅट रिचेबल’ हाेता मी शिवसेनेतच असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाेबतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
चिपळूण : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या गाेटात शिवसेनेचे एक-एक आमदार दाखल हाेत आहेत. त्यातच आमदार भास्कर जाधव यांचा फाेन कालपासून ‘नाॅट रिचेबल’ झाल्याने चर्चेला एकच उधाण आले हाेते. मात्र, भास्कर जाधव हे सकाळी चिपळुणात दाखल झाले असून, नेटवर्क नसल्याने आपला फाेन ‘नाॅट रिचेबल’ हाेता मी शिवसेनेतच असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाेबतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना शिवसेनेच्या काही आमदारांनी पाठिंबा दिला असून, हे सारे आमदार गुवाहाटीत ठाण मांडून आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या बंडाळीनंतर त्यांच्या साेबत आणखी काेण काेण आमदार जाणार याची चर्चा जाेरात सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव आमदार याेगेश कदम सध्या एकनाथ शिंदे यांच्या गाेटात सामील झाले आहेत. त्यांच्यानंतर आणखी काेण आमदार गुवाहाटीला जाणार का, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यातच काल रात्रीपासून आमदार भास्कर जाधव यांचा फाेन ‘नाॅट रिचेबल’ झाल्याने आमदार भास्कर जाधवही गुवाहाटीला गेल्याची चर्चा सुरु झाली हाेती. शुक्रवारी सकाळपर्यंत त्यांचा फाेन ‘नाॅट रिचेबल’ लागल्याने साऱ्यांची घालमेल सुरु झाली हाेती.
एकनाथ शिंदे सुरतला दाखल झाले त्यावेळी आमदार भास्कर जाधव चिपळुणात हाेते. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्यानंतर दुपारी ते मुंबईला रवाना झाले हाेते. गेले तीन दिवस ते मुंबईतच हाेते. गुरुवारी रात्री ते मुंबईतून चिपळूणकडे येण्यासाठी निघाले हाेते. शुक्रवारी सकाळी ते चिपळुणात दाखल झाले. यादरम्यान त्यांच्या माेबाईलला रेंज नसल्याने ‘नाॅट रिचेबल’ लागत हाेता. मात्र, सध्या ते चिपळुणात असून, पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत.