इमारत पूर्णत्वाचा दाखला नसलेल्या बांधकाम व्यावसायिकांना नाेटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:28 AM2021-04-14T04:28:38+5:302021-04-14T04:28:38+5:30
चिपळूण : गेल्या दहा वर्षांतील जुन्या इमारतींना पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नाही, अशा बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावण्याचा व जोपर्यंत जुन्या ...
चिपळूण : गेल्या दहा वर्षांतील जुन्या इमारतींना पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नाही, अशा बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावण्याचा व जोपर्यंत जुन्या इमारतींना पूर्णत्वाचा दाखला घेतला नसेल तर त्यांच्या नवीन इमारतीला परवानगी देऊ नये, असा धोरणात्मक निर्णय चिपळूण नगर परिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला.
नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत या वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी स्वरूपात सुमारे आठ कोटी रुपये वसुली केल्याने कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. नगरसेवक सुधीर शिंदे व अन्य नगरसेवकांनी इमारत पूर्णत्वाच्या दाखल्याप्रकरणी प्रशासनाचे लक्ष वेधले. इमारत पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नसल्याने त्याचा थेट परिणाम नगर परिषद उत्पन्नावर होत आहे. अशा इमारतींचे सर्वेक्षण करावा, अशी मागणी केली. यावर नगरसेवक आशिष खातू यांनी पहिल्या इमारतीच्या पूर्णत्वाचा दाखला घेतल्याशिवाय नवीन इमारतीला परवानगी नाही, असा निर्णय घेण्याची मागणी केली.
इमारत पूर्णत्वाचा दाखला घेणे ही नागरिकांचीही जबाबदारी आहे. तरीही दहा वर्षांपूर्वीच्या इमारती आहेत, त्यांनी जुन्या इमारतींना पूर्णत्वाचा दाखला नसेल तर नोटीस बजावण्यात येईल, असे यावेळी मुख्याधिकारी वैभव विधाते यांनी स्पष्ट केले. त्यानुसार सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा खेराडे यांनी घरपट्टी व पाणीपट्टीविषयी काही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विशेष सभा घेतली जाईल, असे स्पष्ट केले.
कोरोनाविषयी गंभीर व्हा : मोदी
दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाबाबत नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी गंभीर व्हायला हवे. खेड, दापोली नगर परिषदेने कोविड सेंटरची तयारी सुरू केली आहे. त्याच पद्धतीने चिपळूण नगर परिषदेने तयारीला लागले पाहिजे. काही ठिकाणी संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह येत आहे. तेव्हा वेळीच उपाययोजना करायला हव्यात. तेव्हा लवकरच विशेष सभा घ्यावी. प्रशासनाकडून ठराविक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी केली. यावर नगराध्यक्षा खेराडे यांनी त्यावर योग्य ते काम सुरू असल्याचे स्पष्ट केले.
रश्मी गोखले देणार राजीनामा
नगर परिषदेतील स्वीकृत नगरसेविका व शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटक रश्मी गोखले या येत्या २२ एप्रिल रोजी आपल्या स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा देणार आहेत. यासभेत सर्व सदस्यांनी सव्वा वर्षे सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. दरम्यान, पुढील सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी शिवसेनेच्या उपशहर प्रमुखांची निवड केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.