आता व्हा आत्मनिर्भर १४१ जणांना मिळणार दहा लाखांपर्यंत अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:38 AM2021-09-04T04:38:08+5:302021-09-04T04:38:08+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यातील लघु उद्योजकांना विस्तारित करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे उन्नयन योजना ...
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यातील लघु उद्योजकांना विस्तारित करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे उन्नयन योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आंबा, काजू, हळद, कोकम प्रक्रिया उद्योजकांना या योजनेत सहभागी होऊन उद्योगाचा विस्तार वाढविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातून १४१ लघु उद्योजकांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तालुक्यातील कृषी विभागांना याबाबत सूचना करण्यात आल्या असून, वैयक्तिक, संस्थात्मक, फार्मर प्रोड्युसर कंपनी या योजनेतंर्गत सहभागी होऊ शकतात. केंद्र शासन पुरस्कृत या योजनेंतर्गत उद्योगाना पतमर्यादा उपलब्ध करून देणे, उत्पादनाचा दर्जा व विक्री व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांना बॅंक कर्जाशी निगडित अर्थसाहाय्य उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्यांना प्रकल्प किमतीच्या किमान ३५ टक्केपर्यंत व जास्तीत जास्त दहा लाखांपर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे. लाभार्थी हिस्सा हा प्रकल्प किमतीच्या १० टक्के व उर्वरित बॅंक कर्ज असणार आहे.
नवीन उद्योगांच्या बाबतीत वैयक्तिक प्रक्रियाधारक, शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक संस्था सुरू करत असतील तर एक जिल्हा उत्पादन या धोरणानुसार आंबा प्रक्रिया उद्योगासाठी साहाय्य केले जाणार आहे.
जिल्ह्यासाठी अमर पाटील यांची समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा समन्वक लाभार्थ्यांना अर्ज करण्यापासून त्यांना अनुदान प्राप्त होईपर्यंत मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील आंबा, काजू, हळद, कोकम, अन्य अन्नप्रक्रिया इत्यादी कृषी निर्मित लघु उद्योजकांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचे उन्नयन योजनेमुळे विस्तारित होण्याची संधी प्राप्त होणार आहे. कृषी निर्मित लघु उद्योगासह वैयक्तिक व संस्थात्मक, फार्मर प्रोड्युसर कंपनीही या योजनेंतर्गत सहभागी होऊ शकणार आहे. या योजनेतंर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या प्रकल्पधारकांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. जिल्ह्यासाठी १४१ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तालुक्यासाठी किमान १५ ते २० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असून, उद्दिष्टपूर्तीसाठी तालुका पातळीपासून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील लघु उद्योजकांना या योजनेमुळे उद्योगाचा विस्तार वाढविण्याची संधी प्राप्त होणार आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. आतापर्यंत दहा अर्ज प्राप्त झाले असून, तालुकास्तरावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून, इच्छुकांना अर्ज करण्यापासून लाभार्थ्यांना अनुदान मिळेपर्यंत मार्गदर्शन केले जाणार आहे.
- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी
- या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- प्रक्रियाधारकांनी स्वत: http:pmfme.mofpi.gov.in संकेतस्थळावर अर्ज करावा.
- जिल्हा संसधान व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.