आता पिकांचे होणार सर्वेक्षण
By admin | Published: September 6, 2016 10:53 PM2016-09-06T22:53:15+5:302016-09-06T23:42:34+5:30
एकात्मिक कीड व्यवस्थापन : सततच्या पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव
रत्नागिरी : एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे. यावर्षी सुरूवातीपासून पर्जन्यमान चांगले राहिले आहे. सततच्या पावसामुळे कीडरोग तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. गतवर्षी अल्प पर्जन्यमानामुळे भात पिकाचे नुकसान झाले होते. यावर्षी पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना सावध करून उपाय-योजनेसाठी कृषी विभागाने एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेतला आहे.
गरवे, निमगरवे तसेच संकरीत भात पिकाची लागवड करण्यात येते. गरवे भात फुलोऱ्यास आले आहे. निमगरवे भात फुलोऱ्यास येण्याच्या अवस्थेत आहे. संकरीत भात तयार होण्यास अद्याप अवकाश आहे. गरव्या पिकासाठी पावसाचे प्रमाण कमी असणे गरजेचे आहे. पहाटेच्या वेळेचा तर पाऊस पिकास नुकसानग्रस्त ठरू शकतो. शिवाय उन्हाचा कडाका वाढला तरी पिकावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ढगाळ वातावरणात पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे यांसारख्या कीडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. एकूणच बदलत्या हवामानाचा पिकावर होणारा परिणाम व त्यावेळी शेतकऱ्यांनी तत्काळ कोणत्या उपाययोजना कराव्यात, कोणत्या कीटकनाशकांची फवारणी करावी, याबाबत माहिती कृषी पर्यवेक्षक, निरीक्षक माहिती देणार आहेत. भातपिकाच्या पाहणीबरोबर भातकापणीचा आढावा घेण्यात येणार आहे. मोबाईल अॅप कृषी विभागाने सुरू केले असून, कापणी व पिकाचा आढावा, माहिती मोबाईलव्दारे संकलित केली जाणार आहे. कीडरोग व्यवस्थापनाबद्दल विद्यापीठातील तज्ज्ञांतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने पिकाची परिस्थिती समाधानकारक आहे. सद्यस्थितीत पीक परिस्थिती उत्तम असल्याची माहिती कृषी अधीक्षक जगताप यांनी दिली. मात्र, अजून पाऊस पडण्याची शक्यता आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत पाऊस असतो. अनेकवेळा कापणीच्या हंगामात पावसाचे प्रमाण वाढते व शेतकऱ्यांचे नुकसान होते. कापलेले भातपीक पाण्यात राहिल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे.
जिल्ह्यात किरकोळ कीड व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून उपाययोजना करण्यासाठी भाग पाडल्याने कीडरोग आटोक्यात आहे. भविष्यात पीक वाचवण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असून, शेतकऱ्यांना त्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
जगताप : आतापर्यंत जिल्ह्यात ३० हजारपेक्षा जास्त मिमी पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात ७० हजार हेक्टर क्षेत्र भातपीक, तर २१ हजार हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३० हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ३६ पर्यवेक्षक, २५० निरीक्षक भातशेतीचे सर्वेक्षण करणार आहेत.