आता सामना तिसऱ्या लाटेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:21 AM2021-06-27T04:21:05+5:302021-06-27T04:21:05+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही कमी होत नसल्याने आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. उशिरा उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमुळे अत्यवस्थ होणाऱ्या ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही कमी होत नसल्याने आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. उशिरा उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमुळे अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली असून, मृत्यू हाेणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. त्यातच आता तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आल्याने पुन्हा ऑक्सिजन बेड, कोविड केअर सेंटर, तसेच औषधांचा साठा वाढविण्यात आला असून, गरज लागल्यास अधिक यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. रत्नागिरी शहरात मारूती मंदिर येथील जिल्हा क्रीडा कार्यालय येथे तसेच स्वस्तिक रुग्णालय आणि जिल्हा महिला रुग्णालय या तीन ठिकाणी बाल कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहेत, तसेच महिला रुग्णालय येथील ऑक्सिजन निर्मिती सुविधा उभारण्यात आली आहे. महिला रुग्णालयातील बालकांसाठी २० खाटांचे अतिदक्षता कक्ष आणि स्वस्तिक रुग्णालयातील बालरुग्णांना खेळण्यांपासून अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत. महिला रुग्णालयात असलेल्या ऑक्सिजन निर्मिती संयंत्राच्या माध्यमातून पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन साठा होणार आहे. जिल्ह्यामध्ये ८४० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची सुविधा उभारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
चाचण्यांबरोबर लसीकरणावर अधिक भर
कोरोनाची रुग्णसंख्या भरमसाठ वाढू लागली आहे. संसर्ग रोखण्यासाठी आता कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक नागरिकांना देणे, हे उद्दिष्ट जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड यांनी ठेवले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या ८० लाख इतक्या आमदार निधीतून १९ ते ४४ वयोगटाला लसीकरण करण्यात येणार आहे. रायपाटण कोविड सेंटरसाठी राजापूरचे आमदार राजन साळवी यांनीही १ कोटीचा निधी दिला आहे.
ग्रामपंचायती सज्ज
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेरून ज्यांच्यात सौम्य लक्षणे आहेत, अशांसाठी गावामध्येच विलगीकरण केंद्र उभारण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काही ग्रामपंचायतींनी विलगीकरण केंद्रे उभारली आहेत. तर काही त्या प्रयत्नात आहेत.
कोटसाठी
तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणा व प्रशासनाच्या प्रयत्नामुळे पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या खाली आला आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे व त्यात सातत्याने वाढ करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये ८४० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची सुविधा उभारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
- मिश्रा, जिल्हाधिकारी रत्नागिरी.