आता संयम संपला आहे, शिथिलता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:34+5:302021-06-09T04:39:34+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : लॉकडाऊनचे पालन करून-करून आम्ही होरपळून निघालो आहोत. आता संयम संपला आहे. यापुढे कोणतेही लॉकडाऊन ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : लॉकडाऊनचे पालन करून-करून आम्ही होरपळून निघालो आहोत. आता संयम संपला आहे. यापुढे कोणतेही लॉकडाऊन पाळणार नाही. त्यामुळे १० जूनपासून निर्बंधासह दुकाने उघडी ठेवण्यासाठी शिथिलता द्या, अशी मागणी करणारे पत्र चिपळूण व्यापारी महासंघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. व्यापारी संघटनेच्या या मागणीला आमदार शेखर निकम यांनीही पाठिंबा देत जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे.
चिपळूण व्यापारी महासंघटनेचे अध्यक्ष शिरीष काटकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याबरोबर झालेल्या ऑनलाईन बैठकीत ९ जूनपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात निर्णय झाला होता. कोरोना साखळी खंडित करण्यासाठी हे लॉकडाऊन आवश्यक असल्याने व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा नुकसान सोसून पाठिंबा दिला व प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. हा पाठिंबा ९ जूनपर्यंतच होता.
मुळात गेल्यावर्षीचे चार महिने आणि आता सुमारे ६६ दिवस दुकाने बंद आहेत. त्यामुळे आता मात्र अजून संयम ठेवता येणार नाही. आता आमचा संयम संपला आहे. त्यामुळे ९ जूननंतर चिपळुणातील व्यापारी कोणताही लॉकडाऊन पाळणार नाहीत. त्यामुळे प्रशासनाने याबाबत योग्य निर्णय घ्यावा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
प्रशासनाने त्यासाठी नियमावली तयार करावी, योग्य ते निर्बंध आणि वेळ ठरवून देऊन दुकाने उघडी करण्याची परवानगी देण्यात यावी. बाजारपेठेत कुठेही गर्दी होणार नाही, यासाठीदेखील उपाययोजना करण्यात यावी. तसेच व्यापाऱ्यांनाही नियमांचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत. जे या आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी. परंतु, एकासाठी अन्य व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये. आम्ही सर्व व्यापारी नियमांचे काटेकोर पालन करून कोरोना संसर्गाला चालना मिळेल, असे काहीच करणार नाही, अशी ग्वाही देऊन १० जूनपासून सर्व दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी चिपळूण व्यापारी महासंघटनेने या निवेदनाद्वारे केली आहे.