आता नागरिकांचे हेलपाटे वाचणार
By admin | Published: November 27, 2014 10:40 PM2014-11-27T22:40:57+5:302014-11-28T00:09:06+5:30
आठ दिवसांत ‘नागरी सुविधा केंद्र’ सुरू
रत्नागिरी : पोलीस विभागाशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, त्यांचा वेळ वाचावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारील नियंत्रण कक्षाच्या ठिकाणी येत्या आठ दिवसांत ‘नागरी सुविधा केंद्र’ सुरू केले जाणार आहे. याठिकाणी नागरिकांनी सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल केल्यानंतर त्याचा निपटारा किती दिवसात होणार, हे त्याचवेळी अर्जदारास कळणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या नागरी सुविधा केंद्रात पासपोर्ट पडताळणी, विद्यार्थीसंबंधित कागदपत्रांची पडताळणी, पोलीस क्लियरन्स, हॉटेलला व पेट्रोलपंपाना लागणारे नाहरकत दाखले, सायबर कॅफे परवाना या गोष्टी नागरिकांना ठराविक मुदतीत मिळाल्या पाहिजेत, याची दक्षता घेतली जाणार आहेत. या कामांसाठी अर्ज करताना कोणती कागदपत्र लागणार आहेत, हे पहिल्यांदाच सांगितले जाणार आहे.
सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल केल्याची तारीख विशेष रजिस्टरमध्ये दाखल होणारच, परंतु त्याचवेळी हे काम पूर्ण होऊन कोणत्या दिवशी मिळेल, हेसुध्दा त्याचवेळी संबंधित अर्जदाराला कळणार आहे. अर्ज स्वीकारण्याचा दिनांक व पूर्तता दिनांक अशा स्वतंत्र रजिस्टरमधील नोंदीवरून पूर्तता दिवसाच्या चार दिवस आधी या कामांचा पाठपुरावा घेतला जाणार आहे, असे अधीक्षक शिंदे यांनी सांगितले.
पोलिसांच्या कामांसाठी १०९३ नंबरने हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अडचणी, रखडलेल्या कामांबाबत तातडीने दखल घेणे, सोडवणूक करणे शक्य होणार आहे. रत्नागिरीप्रमाणे पोलिसांसाठी कर्मचाऱ्यांसाठी चिपळुुणात ग्राहक भांडार सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात पती-पत्नीमधील वाद-विवादाचे प्रमाण अधिक असून, त्याबाबत पोलीस दक्षता विभागाकडून चांगले काम सुरू आहे.
रत्नागिरी, राजापूरसह आता खेडमध्येही महिला बालकल्याण केंद्र सुरू होत आहे, अशी माहितीही शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)