रिफायनरीसाठी आता राजापूर तालुक्याचाच पर्याय : अविनाश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 06:10 PM2020-10-23T18:10:57+5:302020-10-23T18:13:44+5:30
nanar refinery project, Rajapur, Uddhav Thackeray, Ratnagirinews रिफायनरी प्रकल्प राजापुरातून रायगडला हलविण्याच्या हालचाली सुरू असताना आता या प्रकल्पासाठी सिडकोमार्फत आरक्षित जमिनीपैकी ५ हजार एकर क्षेत्रात औषध निर्माण उद्यान विकसित करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे या परिसरात रिफायनरी होण्याच्या आशा धुसर झाल्या असून, आता राजापूर हा एकमेव पर्याय राहिला आहे.
राजापूर : रिफायनरी प्रकल्प राजापुरातून रायगडला हलविण्याच्या हालचाली सुरू असताना आता या प्रकल्पासाठी सिडकोमार्फत आरक्षित जमिनीपैकी ५ हजार एकर क्षेत्रात औषध निर्माण उद्यान विकसित करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे या परिसरात रिफायनरी होण्याच्या आशा धुसर झाल्या असून, आता राजापूर हा एकमेव पर्याय राहिला आहे.
ठाकरे सरकारने राजापूरच नव्हे तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर राजापुरात रिफायनरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवावी, असे आवाहन कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अविनाश महाजन यांनी केले आहे.
सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन आŸईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या सहाय्याने सुमारे ३ लाख कोटींचा भव्य तेलशुध्दीकरण प्रकल्प राजापूर तालुक्यातील नाणार व लगतच्या गावांमध्ये उभारण्यात येणार होता. परंतु शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध करून युती करण्यासाठी हा प्रकल्प रद्द करण्याची अट भाजपला घातली. त्यात हा प्रकल्प रायगडला हलविण्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. याला जनतेने तीव्र विरोध दर्शविताना रायगडला रिफायनरी चालते, मग राजापूरला का नको, असा सवाल उपस्थित केला होता.
या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी सिडकोमार्फत रोहा, अलिबाग, मुरूड तालुक्यातील आरक्षित केलेल्या जमिनीपैकी पाच हजार एकरच्या विस्तीर्ण क्षेत्रात औषध निर्माण उद्यान विकसित करण्याचा निर्णय विद्यमान शासनाने घेतला आहे. तसेच रोह्यातील रिफायनरीसाठीचे इतर क्षेत्रही अनारक्षित करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे रायगड येथे रिफायनरी प्रकल्प उभारण्याची शक्यता मावळली आहे.
आता रिफायनरीसाठी राजापूर हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे. त्यासाठी स्थानिकांनी सुमारे साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे शासनाला सादर केली आहेत. सध्या रिफायनरी प्रकल्पाची आवश्यकता कितीतरी पटीने वाढली आहे. त्यामुळे लवकरात लवकर रिफायनरी मार्गी लागावा, अशी येथील जनतेची मागणी आहे. ठाकरे सरकारने या मागणीचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन महाजन यांनी केले आहे.