राजापूर तालुक्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:21 AM2021-06-17T04:21:54+5:302021-06-17T04:21:54+5:30
राजापूर : कडक लॉकडाऊन करूनही राजापूर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण वाढत आहेत. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस घटलेली ...
राजापूर : कडक लॉकडाऊन करूनही राजापूर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण वाढत आहेत. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस घटलेली रुग्णसंख्या सोमवारी पुन्हा ७७वर गेली आहे. एका दिवसात ७७ रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील सक्रिय रुग्णसंख्या ९४८वर पोहोचली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल परांजपे यांनी दिली.
गेले काही दिवस कोरानाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कडक लॉकडाऊनमध्येही राजापूर तालुक्यात कोरोनाचा आकडा चढताच राहिला आहे. शनिवार, १२ जून रोजी २८ तर रविवार, १३ रोजी ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, सोमवारी पुन्हा तब्बल ७७ रुग्णांची नोंद झाल्याने तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याचे पुढे आले आहे. नव्याने आढळलेल्या या ७७ रूग्णांमध्ये ६० जण आरटीपीसीआर तपासणीत तर १७ जण अँटिजन तपासणीत पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३,२५०वर पोहोचला आहे.
सध्या ६१ रुग्ण रायपाटण कोविड केअर सेंटरमध्ये, २१ जण धारतळेत, तर ५२ रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. ६६३ रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. जिल्ह्याबाहेरील खासगी रुग्णालयात ७ जण, तालुक्याबाहेरील खासगी रुग्णालयात १५ जण, ग्रामपंचायत पातळीवर विलगीकरण केंद्रात १२० जण, ओणी कोविड रुग्णालयात १५ जण, रायपाटण कोविड रुग्णालयात १४ जण उपचार घेत आहेत. आजपर्यंत तालुक्यात २,१५५ जणांनी कोरोनावर मात केली असून, १४७ जणांचा मृत्यू झाला आहे.
तपासणी नाक्यावर तीनजण पॉझिटिव्ह
बाजारपेठेतील वाढती गर्दी लक्षात घेता, मंगळवारी पुन्हा एकदा पोलिसांनी शहराबाहेर पेट्रोल पंपानजीक तपासणी नाका लावत विनाकारण बाजारात येणाऱ्यांची अँटिजन तपासणी केली. याठिकाणी केलेल्या ७३ जणांच्या तपासणीत तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.