कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली, जिल्ह्यासाठी दिलासादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 04:14 PM2020-10-06T16:14:39+5:302020-10-06T16:16:14+5:30
corona virus, ratnagiri news रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्याचे प्रमाण दिसून आले आहे़ मागील आठवडाभराच्या कालावधीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुहेरीवर आली आहे. ही बाब दिलासादायक आहे़
रहिम दलाल
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्याचे प्रमाण दिसून आले आहे़ मागील आठवडाभराच्या कालावधीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुहेरीवर आली आहे. ही बाब दिलासादायक आहे़
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गणेशोत्सव, शिमगा, ईद व अन्य सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले. सप्टेंबर महिन्याच्या २० तारखेपर्यंत १००पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. तीन दिवशी २००पेक्षा जास्तही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते़ त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण होते, तर आरोग्य विभागाकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत होती़
दरम्यान, मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याचे समोर आले आहे़ ही बाब जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे़ त्यातच माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीमही यशस्वीपणे पार पाडली जात आहे़ यामध्ये काम करणाऱ्या आशा, आरोग्य सेविका, शिक्षक आदी आरोग्याबाबत जनजागृतीही करीत आहेत़
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ७,६६९ एवढी असली तरी ६,६०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर २८३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रविवारी ११८ जणांची कोरोनाची टेस्ट घेण्यात आली होती़ त्यामध्ये केवळ ३८ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, तर ८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले़.
मागील ५ दिवसांत प्रत्येकी दिवशी ३०० पेक्षा कमी लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्येही १०० पेक्षा कमी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले़ त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी आहे़