महिलांची संख्या अजून अल्पच

By admin | Published: November 25, 2014 10:25 PM2014-11-25T22:25:02+5:302014-11-26T00:01:01+5:30

अन्य क्षेत्रात आघाडीवर : गाव विकासासाठी सहभाग महत्त्वाचा

The number of females is still less | महिलांची संख्या अजून अल्पच

महिलांची संख्या अजून अल्पच

Next

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -गावाची वाटचाल शांततेकडून समृध्दीकडे व्हावी, या उदात्त हेतूने शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. जेणेकरून गावातील तंटे गावपातळीवरच मिटतील. आज बहुतांश क्षेत्रामध्ये महिलांनी स्वत:चे वर्चस्व सिध्द केले आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना महिला दिसून येत आहेत. परंतु तंटामुक्त गाव मोहिमेत भगिनींचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील तंटामुक्त समिती अध्यक्षपदाच्या निवडीवर नजर टाकल्यास ८० टक्के पुरूष, तर अवघे २० टक्के प्रमाण महिलांचे दिसून येते. १५ आॅगस्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू झाली. आता या मोहिमेने व्यापक स्वरूप धारण केले आहे. गावातील तंटे सोडविणे एवढेच या मोहिमेचे उद्दिष्ट राहिलेले नाही. जिल्ह्यातील तंटामुक्त समिती अध्यक्षपदी हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढ्याच महिलांना संधी मिळाली आहे.
स्त्री - पुरूष समानतेच्या गोष्टी केल्या जात असताना पुरूषप्रधान संस्कृतीने तंटामुक्त समितीत आपले वर्चस्व अजूनही कायम ठेवले आहे. व्यसनमुक्ती, सहकारी पतसंस्था, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणे, पोलीस बंदोबस्ताशिवाय उत्सव, मिरवणुका पार पाडणे, यामध्ये पुरूषांबरोबर महिलांचा सहभाग असतो. तंटामुक्त समितीमध्ये ५० टक्के महिलांना सहभागी करून घेतले, तर ही मोहीम यशस्वी होण्यास नक्की हातभार लागेल.
कुटुंबात होणारी भांडणे, सासू -सुनेचे, नवरा - बायकोचे व महिलांची भांडणे नित्याची आहेत. परंतु संबंधित महिलांच्या व्यथा समजून घेऊन त्या सोडविण्यात महिला यशस्वीरित्या ठरू शकतात. या मोहिमेत गावातील महिला मंडळे, बचत गट, डॉक्टर, वकील, शिक्षिका, अंगणवाडीसेविका, ग्रामसेविकांना समाविष्ट करून घेण्याची तरतूद आहे. परंतु नामधारी महिलांना सहभागी करून घेत अधिकची वर्णी पुरूषवर्गाची असते. त्याऐवजी तंटामुक्त समितीत ५० टक्के पुरूषांबरोबर ५० टक्के महिलांना सहभागी करून घेतले तर तंटे सोडवून गाव शांततेकडे वाटचाल करील. सध्या तंटामुक्त समित्यांचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये किंबहुना अशा समितीवर काम करणाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरू शकेल. मात्र त्यासाठी महिलांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Web Title: The number of females is still less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.