लग्नासाठी संख्येची मर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:31 AM2021-04-16T04:31:14+5:302021-04-16T04:31:14+5:30
चिपळूण : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असून अनेक निर्बंधही घातले आहेत. विवाहासाठी आता ५० वरून ...
चिपळूण : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असून अनेक निर्बंधही घातले आहेत. विवाहासाठी आता ५० वरून केवळ २५ जणांच्या उपस्थितीची अट घातली आहे. त्यामुळे विवाहेच्छुकांना एवढ्या कमी उपस्थितीत विवाह कसा करायचा, ही चिंता भेडसावू लागली आहे.
बीएसएनएल सेवा ठप्प
दापोली : तालुक्यातील उन्हवरे, दाभीळ, पांगारी तसेच दुर्गम भागातील बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोबाइलवरून इतरत्र संपर्क साधणे अडचणीचे होत आहे. त्यातच सध्या बहुतांश व्यवहार ऑनलाइन सुरू असल्याने त्यात व्यत्यय येत आहे.
बनावट शिधापत्रिका
रत्नागिरी : शासनाने बनावट शिधापत्रिका रद्द करण्याची मोहीम मार्च महिन्यात सुरू केली होती. मात्र, ही मोहीम स्थगित करावी, अशी मागणी होत असतानाच आता कोरोनाचाही प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे अपात्र किंवा बनावट शिधापत्रिका रद्द करण्याची मोहीम तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
भटक्या श्वानांचा त्रास
रत्नागिरी : शहर तसेच परिसरात सध्या भटक्या श्वानांचा पुन्हा मुक्त संचार सुरू झाला आहे. साळवी स्टॉप, नाचणे रोड, टीआरपी, जेल नाका, सन्मित्रनगर आदी भागांमध्ये या श्वानांचा संचार वाढला आहे. रात्री वाहनांचा पाठलाग करत असल्याने वाहनचालकांनी या श्वानांचा धसका घेतला आहे.
शाळेला लॅपटॉप
खेड : तालुक्यातील असगणी येथील संदीप फडकले यांच्या प्रयत्नातून असगणी शाळा क्रमांक २ ला लॅपटॉप मिळाला आहे. फडकले यांच्या माध्यमातून पंचक्रोशीतील १८ शाळा डिजिटल झाल्या आहेत. लॅपटॉप देताना सरपंच अनंत नायनाक, माजी सरपंच श्रीकांत फडकले, सुरेश नायनाक, शिक्षण कमिटी अध्यक्ष सुनील धाडवे आदी उपस्थित होते.
उलाढाल ठप्प
रत्नागिरी : गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही सराफा बाजाराला लॉकडाऊनचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. ऐन सणाच्यावेळी सुवर्णकारांची दुकाने बंद राहिल्याने सराफांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. पुन्हा आता सलग १५ दिवस ही दुकाने बंद राहणार आहेत.
कचऱ्याचा ढीग
आवाशी : खेड शहराकडून भोस्ते मार्गे रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या मार्गालगत जगबुडी पुलाजवळ भोस्ते गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात आला आहे. याकडे ग्रामपंचायतीचेही दुर्लक्ष झाले आहे. या कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा कचरा उचलावा, अशी मागणी होत आहे.
शैक्षणिक साहित्य वाटप
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा संगमेश्वर क्रमांक ३ ला समत्व ट्रस्ट, ठाणेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष रूपेश कांबळे तसेच अन्य पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
रस्त्याचे डांबरीकरण
पावस : कोळंबे फाटा ते गोळप पूल आणि बायपास रोड ते गावखडी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. या रस्त्यासाठी पाच कोटी ४५ लाख ८८७ रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मार्गावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना त्रास होत होता. मात्र, आता रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
लसीकरणासाठी गर्दी
राजापूर : सध्या सर्व शासकीय कार्यालये तसेच अन्य आस्थापनांमध्ये लसीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नागरिक गर्दी करू लागले आहेत. अचानक गर्दी वाढल्याने लसीचा साठाही अपुरा पडू लागल्याने अधूनमधून लसीकरण मोहीम थांबविण्यात येत आहे.