निगेटिव्ह लोक ‘लाखमोलाचे’, पाॅझिटिव्ह असणाऱ्यांपेक्षा सहा पट संख्या जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:23 AM2021-04-29T04:23:13+5:302021-04-29T04:23:13+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे दीड लाख एकूण कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांपैकी २०,२७८ लोक कोरोनाबाधित झाल्याने ...
रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे दीड लाख एकूण कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांपैकी २०,२७८ लोक कोरोनाबाधित झाल्याने जिल्हाभरातून चिंता व्यक्त होत असली तरीही आतापर्यंत पाॅझिटिव्ह रुग्णांच्या सहापट म्हणजे १ लाख २३ हजार जण निगेटिव्ह आले आहेत. तसेच आतापर्यंत १३ हजार ६५९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असून, ज्या व्यक्ती कोरोनासंबंधित खबरदारी घेत आहेत, त्या व्यक्तीही कोरोनापासून दूर राहण्यात यशस्वी होत आहेत.
गेल्या १८ मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या भरमसाट वाढली होती. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला होता. या काळात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे नागरिकांचे बाहेर फिरणे कमी झाले होते. त्याचबरोबर कोरोनाच्या धसक्याने लोक मास्क, सॅनिटायझर यांचा सातत्याने वापर करत होते. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या कालावधीत कोरोना रुग्णसंख्या वाढली असली तरीही सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आरोग्य यंत्रणेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नामुळे रुग्णसंख्या लगेचच कमी झाली. मृत्यूचे प्रमाणही कमी झाले.
या काळात शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान सुरू केल्याने अनेक कुटुंबांचे सर्वेक्षण झाले. यातून कोरोनाबरोबरच इतर आजार असलेलेही पुढे आले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे सोपे झाले. त्यांनतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. त्याचबरोबर कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारीही अगदी ९५ पर्यंत गेली. त्यामुळे आता लवकरच जिल्हा कोरोनामुक्तीकडे जाईल, असा दिलासा वाटत होता. मात्र, त्यानंतर लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांनी कोरोनाविषयक आवश्यक त्या खबरदारीकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा जानेवारी - फेब्रुवारीपासून संसर्ग वाढायला सुरुवात झाली आहे.
वाढत्या रुग्णसंख्येचा आकडा मोठा दिसत असल्यामुळे हजारो जणांच्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेल्याकडे तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येकडे दुर्लक्ष होत आहे.
जिल्ह्यात आता कोरोना चाचण्यांची संख्या दररोज १५०० पेक्षा अधिक होत आहेत. जिल्हा रुग्णालयाची कोरोना प्रयोगशाळा २४ तास सुरू आहे. पाॅझिटिव्ह येणाऱ्यांपेक्षा निगेटिव्ह येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेणारे त्यापासून मुक्त राहत आहेत. तसेच बरे होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे, या बाबी जिल्ह्याला दिलासा देणाऱ्या आहेत.
एकाच दिवसांत ४७२ रुग्ण कोरोनामुक्त
जिल्हा रुग्णालयाच्या मंगळवारच्या अहवालानुसार, जिल्ह्यात दिवसभरात ६६२ रुग्ण पाॅझिटिव्ह आले तर ११ जणांचा मृत्यू झाला. मात्र, या दिवसभरात ४९७ लोक कोरोनामुक्त झाले, तर १११३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत आवश्यक ती खबरदारी घेतल्याने तब्बल १ लाख २३ हजार ३८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
निगेटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण ८६ टक्के
निगेटिव्ह अहवाल येणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ८६ टक्के असून, १४ टक्के बाधित होत आहेत. बरे होणाऱ्यांची संख्या ६८ टक्के, तर मृत्यूचा दर २.९८ टक्के इतका आहे.