रूग्णसंख्या कमी होतानाच कोरोनाबाधितांचे मृत्यूही घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 01:50 PM2020-11-12T13:50:50+5:302020-11-12T13:52:27+5:30
coronavirus, death, ratnagirinews ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्हाभरात केवळ ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचे प्रमाण ३.७४ टक्के इतके झाल्याने त्यांच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. गेल्या दहा दिवसात मृतांच्या संख्येत आणखी दोन रुग्णांची वाढ झाल्याने आतापर्यंत एकूण ३१८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
रहिम दलाल
रत्नागिरी : ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्हाभरात केवळ ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचे प्रमाण ३.७४ टक्के इतके झाल्याने त्यांच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. गेल्या दहा दिवसात मृतांच्या संख्येत आणखी दोन रुग्णांची वाढ झाल्याने आतापर्यंत एकूण ३१८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली होती. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सप्टेंबर, २०२० पर्यंत कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या ७४०८ इतकी होती, तर ऑक्टोबर महिन्यात १०४१ रुग्णांची भर पडली होती. चालू महिन्याच्या गेल्या १० दिवसांत केवळ ८२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण ८५३१ झाले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी झालेले असतानाच बरे होण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. सप्टेंबर महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३८ होते, तर त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आणखी वाढ होऊन ते ९३.२६ टक्के इतके झाले. गेल्या १० दिवसात रुग्ण पॉझिटिव्ह मिळण्याचे प्रमाण कमी झालेले असतानाच बरे होण्याचे प्रमाणही ९४.४७ टक्के इतके आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधित २६३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यूचे प्रमाण ३.५५ होते. मात्र, ऑक्टोबर महिन्यात ५३ कोरोनाबाधित रुग्ण मृत झाल्याने एकूण मृतांची संख्या ३१६ झाली आहे. रुग्ण मिळण्याच्या प्रमाणात घट झालेली असल्याने मृतांच्या टक्केवारीमध्ये वाढ होऊन प्रमाण ३.७७ टक्के झाले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या गेल्या १० दिवसांत कोरोनाने केवळ २ रुग्णांचा बळी घेतल्याने मृतांची संख्या ३१८ झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यामध्ये आरोग्य विभागाला यश आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ ५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राजापूर तालुक्यात सध्या एकही रूग्ण नाही. आता कोरोना निर्मूलनाच्या दिशेने जिल्ह्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे.