रूग्णांची संख्या वाढली; डॉक्टरांची घटली
By Admin | Published: September 17, 2016 10:10 PM2016-09-17T22:10:06+5:302016-09-17T23:56:18+5:30
जिल्हा रुग्णालय : वातावरणातील बदलामुळे आजारांना बळ
रत्नागिरी : सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे व बदललेल्या वातावरणामुळे साथीच्या आजारांना बळ मिळाले आहे. गेले दोन दिवस जिल्हा शासकीय रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. परंतु, या रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर व तज्ज्ञांची संख्या कमी आहे. एका बाजूला रुग्णांचा संख्येत वाढ होतेय तर दुसऱ्या बाजूला डॉक्टरांची संख्या घटताना दिसत आहे. फिजिशीयन डॉक्टरांचा शोध डोकेदुखी ठरत आहे.
हायटेक होण्याचा मार्गावर असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला सध्या अनेक समस्यांनी घेरले असल्याचे दिसत आहे. डॉक्टरांची समस्या, तज्ज्ञ नाही तसेच अन्य अत्यावश्यक सुविधाही बंद असल्याने रुग्णांना रिपोर्ट करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे अत्यंत कमी मनुष्यबळात शासकीय रुग्णालयाचे कामकाज सुरू आहे. परंतु, याचा त्रास मात्र रुग्णांना होत आहे. त्याबरोबर डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना अतिरिक्त कामकाज करावे लागत आहे.
गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. परिणामी साथीच्या आजारांना बळ मिळाले आहे. त्यामुळे रुग्णाचा संख्येतही दुप्पटीने वाढ झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाची २०० रुग्णांची क्षमता आहे. मात्र, सध्या याठिकाणी २१२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे काही रुग्णांवर जमिनीवर बेड टाकून उपचार केले जात आहेत. अपुऱ्या डॉक्टर संख्येमुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३० पदे भरण्यात आली आहेत. परंतु, त्यातील ८ डॉक्टर गैरहजर तर २ निलंबित आहेत. त्यामुळे केवळ २० डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. येथे तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा जाणवत असून, १९ पदे मंजूर असताना तब्बल १४ पदे अद्यापही रिक्त आहेत. निव्वळ ५ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांमागे धावपळ करावी लागत आहे. त्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांचाही समावेश आहे. (वार्ताहर)
अपुऱ्या संख्येतही चांगल्या सेवेचा प्रयत्न
जिल्हा शासकीय रुग्णालयात ४० टक्के मनुष्यबळ असतानासुध्दा येथील डॉक्टर व कर्मचारी जोमाने काम करत आहेत आणि चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लोकांकडून त्याबाबत फार मोठ्या तक्रारी आलेल्या नाहीत.