काेराेना रुग्णांची संख्या घटताच जिल्ह्यातील शाळांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:29 AM2021-08-01T04:29:34+5:302021-08-01T04:29:34+5:30
मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने कोरोना नसलेल्या गावातून शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ...
मेहरुन नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासनाने कोरोना नसलेल्या गावातून शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. सुरुवातीला अवघ्या पाच शाळा सुरू झाल्या होत्या; मात्र पालकांच्या प्रतिसादामुळे शाळा सुरू होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत १६ शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण मात्र अल्प आहे.
शासनाने कोरोना नसलेल्या गावातून शाळा आठवी ते बारावीपर्यंतच वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती; मात्र त्यासाठी गावात एक महिना कोरोना रुग्णसंख्या शून्य असल्याची अट घालण्यात आली होती. शिवाय पालकांच्या संमत्तीने शाळा सुरू करण्यात यावी, तसेच त्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून समितीने निर्णय घेऊन ठराव पास करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतरच शाळा सुरू करण्यात याव्यात, शिवाय कोरोना नियमावलींचे पालन करण्याचे सूचित केले होते. शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनानुसार शाळांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. त्यानुसार सात तालुक्यातील १६ शाळा सुरू झाल्या आहेत; मात्र रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील शाळा अद्याप बंद आहेत.
जिल्ह्यात आठवी ते बारावीपर्यंत एकूण ४५४ शाळा असून अवघ्या १५ शाळा सुरू झाल्या आहेत. एक लाख २ हजार १०८ विद्यार्थी संख्या असताना १२३९ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. उपस्थितीचे प्रमाण अत्यल्प आहे. एकूण उपस्थितीवरून ऑनलाईन अध्यापन पद्धतीकडे विद्यार्थी, पालकांचा प्रतिसाद चांगला लाभत आहे. कोरोनामुळे पालक पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.
रत्नागिरीत प्रमाण शून्य
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी राजापूर,लांजा, गुहागर, खेड, चिपळूण, दापोली, संगमेश्वर तालुक्यातील १६ शाळा सुरू झाल्या आहेत. रत्नागिरी व मंडणगड तालुक्यातील एकही शाळा मात्र अद्याप सुरू झालेली नसल्याने प्रमाण शून्यावर आहे. कोरोना रुग्णसंख्या शून्य असलेल्या गावातून शाळा सुरू होऊ शकतात, यासाठी पालक, ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
शिक्षण विभागाच्या सूचनेला प्रतिसाद देत सुरुवातीला जिल्ह्यातील अवघ्या पाच शाळा सुरू झाल्या होत्या.
मात्र दहा दिवसात नव्याने दहा शाळा सुरू झाल्या आहेत. शाळांची संख्या १६ झाली आहे.
आठवी ते बारावीपर्यंत एक लाख २ हजार १०८ विद्यार्थी संख्या असताना सध्या वर्गात १२३९ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.
n नेटवर्क अभावी ऑनलाईन अध्यापनात समस्या निर्माण होते.
n दहावी व बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने वर्ग सुरू करण्यावर भर
n कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे शाळा सुरू होण्याचे प्रमाण वाढले.
n शाळा सुरू होण्याचे प्रमाण वाढत असताना, विद्यार्थी संख्या वाढणे अपेक्षित असताना वाढ झालेली नाही.
कोरोनामुळे शाळेचे अध्यापनाचे तास कमी केले आहेत. शाळांकडून प्रत्यक्ष अध्यापन करीत असताना विद्यार्थी आरोग्य सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्यात येत आहे; मात्र मुलांची भीती वाटते. बहुधा शाळा सुटल्यानंतर एकत्र येताना, सोशल डिस्टन्सिंग राखले जात नाही. मास्क वापराबाबत टाळाटाळ होत आहे.
- प्रकाश जाधव,
पालक, राजापूर
शाळेतील अध्यापन व ऑनलाईन अध्यापन यामध्ये कमालीचा फरक आहे. ऑनलाईन अध्यापनात वेळेची मर्यादा आहे. प्रत्यक्ष अध्यापनात शिक्षक एकच भाग जास्त वेळ समजावून सांगतात. शिवाय मित्रांकडूनही कठीण प्रश्नांबाबत चर्चेतून सोपा होतो. ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन अध्यापन योग्य आहे.
- ऋग्वेद पाटील, विद्यार्थी, राजापूर
ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन अध्यापन सोपे वाटते. शिक्षक आम्हाला आकलन होईपर्यंत तो भाग समजावून सांगतात. शाळा सुरू असणे गरजेचे आहे.
- सीमंतिनी मुळ्ये, विद्यार्थी