‘बालभारती’ प्रश्नसंचात असंख्य चुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:30 AM2021-03-19T04:30:00+5:302021-03-19T04:30:00+5:30
रत्नागिरी : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने प्रश्नसंच उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, यामध्ये काही प्रश्न एकापेक्षा जास्त ...
रत्नागिरी : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने प्रश्नसंच उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, यामध्ये काही प्रश्न एकापेक्षा जास्त वेळा प्रसिध्द करण्यात आले असून, वगळलेल्या अभ्यासक्रमाबाबतही प्रश्न देण्यात आले असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षेच्या सरावासाठी ऑनलाईन प्रश्नसंच उपलब्ध केले आहेत. पहिल्या टप्प्यात बारावीच्या सात आणि दहावीच्या सहा विषयांचे प्रश्नसंच उपलब्ध केले आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत सर्व विषयांचे प्रश्नसंच मिळणार आहेत. लॉकडाऊनमुळे काही शाळा अद्याप बंद असल्याने विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव मोडला आहे. शासनाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी अद्याप नियमावली जारी केलेली नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
उपलब्ध करून देण्यात आलेल्या या संचात काही चुका असल्याचे पालक आणि विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे पुढे येणारे प्रश्नसंच योग्य पध्दतीने तपासून अपलोड करावेत, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे. यावर्षी दहावी व बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाबाबतचे प्रश्न या संचात आहेत. यामुळे हे प्रश्नसंच अभ्यासपूर्णरित्या तयार झाले नसल्याची टीका केली जात आहे.