परिचारिकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:32 AM2021-05-19T04:32:39+5:302021-05-19T04:32:39+5:30
रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या मदत केंद्रातर्फे हेल्थ ड्रिंकचे वाटप करण्यात ...
रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या मदत केंद्रातर्फे हेल्थ ड्रिंकचे वाटप करण्यात आले. परिचारिका स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करीत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी समितीने हा उपक्रम राबविला. महिला रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय येथील परिचारिकांना हेल्थ ड्रिंकचे वाटप करण्यात आले.
कुक्कुटपालनद्वारे रोजगार
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथे राजवैभव राऊत या विद्यार्थ्याने कुक्कुट पालन व्यवसायाचा अवलंब करीत कुटुंबाला आर्थिक हातभार लावला आहे. वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असतानाच त्याने हा जोडधंदा सुरू केला आहे.
ज्येष्ठांना प्राधान्य द्या
चिपळूण : सध्या लसीकरण पुन्हा थांबले आहे. मध्यंतरी तौक्ते चक्रीवादळामुळे लसीकरण थांबविण्यात आले होते. लसचा अपुरा साठा असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणात अनियमितता आली आहे. त्यामुळे ज्या प्रमाणात लसचा पुरवठा येईल, त्यात ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
इक्बाल मुल्लांची निवड
चिपळूण : तालुक्यातील अलोरे येथील जमातुल मुस्लिमीन संघटनेच्या अध्यक्षपदी इक्बाल मुल्ला यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. उपाध्यक्षपदी मुराद मुल्ला, सचिवपदी सिकंदर चिपळूणकर आदींची निवड करण्यात आली आहे.
लसीकरणात व्यत्यय
साखरपा : दुर्गम भागात इंटरनेट सुविधांमध्ये सातत्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे लाभार्थ्यांना अवघड होत आहे. या अडचणींचा विचार करून लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामीण भागात स्वतंत्र बुथ उभारून लसीकरणाची विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी गाव विकास समितीतर्फे करण्यात येत आहे.
टंचाईला दिलासा
मंडणगड : एप्रिल महिन्याच्या अखेरपासून काही दुर्गम भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र, कोकणाच्या किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात दोन दिवस पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी टंचाई संपुष्टात येण्यास मदत झाली आहे.
महामार्गावर माती
चिपळूण : तौक्ते चक्रीवादळामुळे वादळी वाऱ्यासह तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने परशुराम येथे चौपदरीकरणातील भरावाची माती मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर आल्याने हा मार्ग चिखलमय झाला होता. अजूनही पाऊस सुरु असल्याने सध्या या महामार्गावरुन वाहतूक करताना त्रासदायक होत आहे.
वीजपुरवठा कोलमडला
पाली : तौक्ते चक्रीवादळामुळे जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये विजेचे खांब वाकले आहेत, तर काही ठिकाणी अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. काही झाडांच्या फांद्याही विजेच्या तारांवर पडल्याने तारा तुटल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये सध्या वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.
रुग्ण कमी होण्याची अपेक्षा
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून भरमसाठ वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने एप्रिल महिन्याच्या १५ तारखेपासून कडक लॉकडाऊनला प्रारंभ केला आहे. लॉकडाऊनची मुदत १ जूनपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे आता तरी रुग्ण कमी व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोविड सेंटरची गैरसोय
रत्नागिरी : रविवारी झालेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या जोरदार दणक्याने जिल्ह्यातील अनेक कोविड सेंटरचा वीजपुरवठा खंडित केला. काही ठिकाणी वीज कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र, काही ठिकाणी वादळाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने तिथला वीजपुरवठा सुरळीत होताना अनेक अडचणी आल्या.