रत्नागिरी जिल्हा परिषदेत उद्यापासून पोषण माह, ३० सप्टेंबरपर्यंत उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 04:49 PM2018-09-06T16:49:56+5:302018-09-06T16:55:01+5:30
केंद्र शासनाने सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार दिनांक ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे महिला व मुलींसाठी विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : केंद्र शासनाने सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार दिनांक ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे महिला व मुलींसाठी विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पोषण आपल्या घरी कार्यक्रमांतर्गत अन्नदानाचे महत्त्व कळावे यासाठी ७ रोजी मूठभर धान्य प्रत्येक घरामधून जमा करणे व जमलेल्या धान्यातून विविध पाककृती तयार करुन या पाककृतींचे प्रात्यक्षिक बालकांच्या मातांना दाखवणे, बाळगोपाळांची पंगत आयोजित करणे, एएनएम, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, स्वयंसहाय्यता बचतगट यांची एकत्रित आयवायसीएफ आणि चांगल्या आरोग्याच्या सवयीबाबत लोकजागृती होण्याकरिता एकत्रित गृहभेट देणे, असे उपक्रम आरोग्य विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहेत.
११ रोजी ग्रामत्रिसुत्री कार्यक्रमांतर्गत ग्रामआरोग्य, स्वच्छता, तसेच पोषण दिवसचे आयोजन आरोग्य विभागाच्या सहकार्याने केले जाणार आहे. २१ रोजी पोषण आॅलिम्पीयाड या उपक्रमाचे आयोजन महिला व बालविकास विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यातर्फे केले जाणार आहे.
२५ रोजी पोषणाची वारी कार्यक्रमांतर्गत प्रभातफेरी, एएनएम, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, स्वयंसहाय्यता बचतगट यांची एकत्रित आयवायसीएफ आणि चांगल्या आरोग्याच्या सवयीबाबत लोकजागृत्ती होण्याकरिता एकत्रित गृहभेट देणे, ० ते ६ वयोगटातील बालकांचे वजन घेणे व छाननी करणे, किशोरवयीन मुलींकरिता जनजागृती शिबिराचे आयोजन, स्त्रियांविषयी असलेल्या कायद्यांबाबतची माहिती देणे, असे उपक्रम महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक, आरोग्य विभाग, पाणी व स्वच्छता विभागांमार्फत राबविण्यात येणार आहेत.
२७ रोजी भाजीपाला परसदारी कार्यक्रमांतर्गत रिलायन्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने परसबागांची निर्मिती करणे, स्वयंपाक घरातील टाकाऊ पदार्थांपासून बायोगॅस युनिट बसविणे असे उपक्रम महिला व बालविकास विभागातर्फे राबविण्यात येणार आहेत. २९ रोजी पोषण सारांश कार्यक्रमांतर्गत पोषण महिना म्हणून संपूर्ण महिनाभरात केलेल्या कामकाजाचा अहवाल फोटोसह एकत्रित करुन हा प्रकल्प अहवाल वरिष्ठस्तरावर सादर करण्यात येणार आहे.
विविध उपक्रम राबविले जाणार
- केंद्र शासनाने सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत महिला व मुली यांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने पोषण माहच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
- पोषण दिवस कार्यक्रमांतर्गत ११ रोजी बालकांची आरोग्य तपासणी, किशारवयीन मुलींची एचबी तपासणी, बीएमआयची माहिती देणे. महिला व मुलींसाठी आयुषमार्फत योगाचे प्रशिक्षण घेतलेल्या किशोरी मुलींमार्फत योगाचे, ज्युडो कराटे कार्यक्रमाचे आयोजन करणे असे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.
- १३ ते २३ सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीत पोषणाचा श्रीगणेशा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत कुपोषण निमूर्लन, माझी कन्या भाग्यश्री, बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनांचे फलक लावणे तसेच गणेशोत्सवात या विषयांचे देखावे सादर करणे, असे उपक्रम यादरम्यान राबविण्यात येणार आहेत.