गंगाक्षेत्र विकासाच्या मार्गातील अडथळे अखेर दूर
By admin | Published: September 22, 2016 12:49 AM2016-09-22T00:49:40+5:302016-09-22T00:49:40+5:30
विविध ठिकाणांची पाहणी : सार्वजनिक उपक्रम समितीची राजापूरला भेट
राजापूर : महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय सार्वजनिक उपक्रम समितीच्या वतीने राजापुरातील सुप्रसिध्द अशा गंगा क्षेत्राची पाहणी करण्यात आली. त्यामुळे शासकीय पातळीवरून या क्षेत्राचा विकास होण्याच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. विधानसभेचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने रत्नागिरी जिल्हा दौऱ्यात विविध ठिकाणांची पाहणी केल्यानंतर राजापुरात गंगाक्षेत्राची पाहणी केली.
देश-विदेशात प्रसिध्द असणाऱ्या गंगेचे आगमन ऐन पावसाळ्यात झाले असून, ती पूर्ण क्षमतेने प्रवाहीत आहे. या पर्यटनस्थळाचा ज्या प्रमाणात विकास व्हायला हवा तसा झाला नाही, त्याची दखल राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी घेऊन प्रयत्न केले. त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय, सार्वजनिक उपक्रम समितीने रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, लांजा तालुक्यातील माचाळ याठिकाणी जाऊन पाहणी केली. माचाळसारखे निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण तर साक्षात महाबळेश्वरची आठवण करून देते, असे गौरवोद्गार समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांनी काढले. आजवर त्या पर्यटनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ठिकाणाबाबत कोणालाच पत्ता नव्हता. मात्र, यावेळी समितीच्या माध्यमातून पाहणी केल्यानंतर तेथील सौंदर्य दिसले, त्याचे श्रेय आमदार राजन साळवींना असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी आमदार साळवींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माचाळबाबत पत्रव्यवहार केला होता. स्वत: मुख्यमंत्र्यांनीही अनुकूलता दर्शवली होती. त्यानुसार तेथे जाऊन समितीने पाहणी केली आहे. आता आमदार साळवी यांच्या विनंतीनुसार राजापूरच्या गंगाक्षेत्राची पाहणी करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
एखादा उद्योग आणला तर साधारणपणे अठरा ते वीसजणांना रोजगार मिळतो. मात्र, पर्यटनाच्या दृष्टिने विचार केल्यास सत्तर ते ऐंशी जणांना रोजगार मिळतो. त्यामुळे रोजगारासाठी पर्यटन उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या या ठिकाणांच्या विकासाचा प्रश्न हाती घेण्यात आला आहे. राजापूरच्या गंगा स्थानाबाबतही आवश्यक ते प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. सुनील देशमुख यांच्यासमवेत आमदार आकाश फुंडकर, आमदार राजन साळवी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. बोबडे, राजापूरचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, गटविकास अधिकारी शिवाजी माने, सभापती सोनम बावकर, उपसभापती उमेश पराडकर उपस्थित होते. गंगाक्षेत्राचे अध्यक्ष मंदार सप्रे, श्रीकांत घुगरे व अन्य मान्यवरांचा यात समावेश होता.
महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय सार्वजनिक उपक्रम समितीकडून झालेल्या पाहणीमुळे भविष्यात या क्षेत्राचा विकास होण्याचा मार्ग अधिक प्रशस्त बनला आहे. (प्रतिनिधी)