पेट्रोलसाठी शेतकऱ्यांची प्रशासनाकडून अडवणूक; बविआचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:38 AM2021-06-09T04:38:44+5:302021-06-09T04:38:44+5:30
एकप्रकारे शेतकऱ्यांनी जगावं की मरावं? असा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने शेतकऱ्यांवर हुकूमशाही सुरू केलेली असल्याचे कुळ्ये यांनी सांगितले. ...
एकप्रकारे शेतकऱ्यांनी जगावं की मरावं? असा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने शेतकऱ्यांवर हुकूमशाही सुरू केलेली असल्याचे कुळ्ये यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रशासन आणि त्यांना नाचवणारे लोकप्रतिनिधी येथील नागरिकांच्या समस्यांचे कोणतेही सोयरसुतक नसल्यासारखे वागत आहेत. व्यापारी वर्गाशी चर्चा करून लॉकडाऊन लावला जातो, पण येथील सामान्य शेतकऱ्यांशी कधी चर्चा करणार? असा सवाल तानाजी कुळ्ये यांनी केला आहे. शेती हंगामासाठी नियोजन करणे आवश्यक असताना प्रशासन अपयशी ठरले आहे.
गेले दोन महिने सर्वसामान्य माणसांबरोबरच येथील शेतकरी, कष्टकरी लॉकडाऊन काळात घरी आहेत. हाताला काम नाही, त्यामुळे पैसा नाही, पैसा नाही म्हणून किराणा नाही. अशा परिस्थितीत नैराश्येच्या गर्तेत अडकलेला आहे. अनेक सामान्यकुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहेत. पोलिसांनीही शेतकऱ्यांशी सौजन्याने वागावे, शेतीसाठी लागणारे बियाणे, पॉवर ट्रिलर, खते, इंधन आदी कृषी विषयक खरेदीसाठी शेतकरी ये-जा करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांची जर अशापकारे अडवणूक होत असेल तर त्यांना शेतीसाठी पेट्रोल-डिझेल जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून देण्याची मागणीही कुळ्ये यांनी केली आहे.