ग्रामपंचायतींना ओएफसी जोडणी
By admin | Published: November 23, 2014 10:10 PM2014-11-23T22:10:42+5:302014-11-23T23:44:20+5:30
खेड तालुका : सहा कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
खेड : बीएसएनएल ग्रामीण भागातील जलदगती सेवेसाठी नॅशनल फायबर आॅप्टिकल नेटवर्क हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच साकारत आहे़ जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, मंडणगडसह खेड तालुक्याचाही यात समावेश करण्यात आला असून, खेड तालुक्यातील ११४ ग्रामपंचायती जोडल्या जाणार आहेत़ यासाठी ६ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे़ मार्च २०१५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे बीएसएनएलचे प्रयत्न आहेत. यामुळे जलद संपर्क साधणे शक्य होणार आहे.
महाप्रबंधक सुहास कांबळे यांनी ही माहिती जाहीर केली़ या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे़ बीएसएनएलच्या मालकीचे जे टॉवर्स खासगी कंपनीने भाडेतत्त्वावर घेतले आहेत़, त्यासंबंधीच्या अटी आणि शर्ती संबंधित कंपन्यांनी पूर्ण न केल्याने हे टॉवर्स पडून आहेत, हेच टॉवर्स या कंपन्यांकडून घेऊन त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून ग्राहकांना अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न होणार आहे. सध्या जिल्हाभरात वील, लँडलाईन, प्रोडॉड, आयटीसी, डाटा, मोबाईल, लीस्ड लाईन, आयएसडीएन आदी सेवा सुरू आहेत. कमी भाडे, तांत्रिक समस्येचे निवारण, जलद सेवा, सिंगल विंडो सर्व्हिस आणि प्रवासात कोठेही वापरावी, अशा सेवा सध्या सुरू असल्याने देशभरात सर्वत्र जाळे पसरले आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांनाही याचा लाभ मिळणार आहे. इंटरनेटसह सर्वच सुविधा या प्रकल्पामध्ये उपलध होणार असल्याने लवकरच या कामांना प्रारंभ होणार आहे. खेड तालुक्यातील काही प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळादेखील इंटरनेटने जोडण्यात येणार आहेत़ यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने खेड तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (प्रतिनिधी)
११४ ग्रामपंचायती कनेक्ट होणार
मार्च २०१५ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे बीएसएनएलचे प्रयत्न.
खेड तालुक्यातील ११४ ग्रामपंचायती जोडल्या जाणार.
महाप्रबंधक सुहास कांबळे यांची माहिती.
प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळादेखील इंटरनेटने जोडणार.