क्रीडा अधिकाऱ्याविरोधात गुन्हा
By admin | Published: July 16, 2014 10:31 PM2014-07-16T22:31:37+5:302014-07-16T22:41:29+5:30
लाखोंचा अपहार : गोविंद टिळवेंनी दिली माहिती
सावंतवाडी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सन २००६ ते २०१२ या कालावधीत लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी जे. पी. आदाणे, तत्कालीन प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी सय्यद साजिद हुसेन व बा. बा. क्षीरसागर या तिघांविरोधात गोविंद उर्फ भाई गणेश टिळवे यांनी ओरोस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ओरोस पोलिसांनी याबाबत तिन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याची माहितीही टिळवे यांनी देत या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत गोविंद टिळवे यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी टिळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार ओरोस येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून लाखो रुपयाचा अपहार झाला असून हा अपहार संगनमताने खोट्या पावत्या देत कार्यालयीन अभ्यास न करता स्वत:च्या फायद्यासाठी केलेला आहे.
टिळवे म्हणाले, सामाजिक कार्य करताना जिल्ह्यातील अपहाराविरोधात आवाज उठविणे कर्तव्य मानतो. जिल्हा क्रीडा कार्यालयातील अपहाराचा सुगावा लागताच माहितीच्या अधिकारातून कागदपत्रे जमा करुन हा घोटाळा समोर आणला आहे. यामध्ये दोषींनी संगमताने गेली कित्येक वर्षे अपहार केल्याचे दिसून आले आहे.
मात्र, २००६ ते २०१२ या कालावधीतील अपहाराचे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पुराव्यांच्या सहाय्याने जे. पी. आदाणे, सय्यद हुसेन, बा. बा. क्षीरसागर या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याआधी क्रीडा कार्यालयातील तृतीय श्रेणी अधिकारी पी. एस. चव्हाण यांनीही या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यांची बदली चंद्रपूरला करुन हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न वरिष्ठांकडून झाल्याचेही टिळवे यांनी सांगितले. गुन्ह्याच्या तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे व पोलीस निरीक्षक पी. जे. चौधरी करत आहेत. गुन्हा निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
क्रीडा कार्यालयाकडून एक हजार बनावट पावत्या केल्या आहेत. आॅडिटही झाले नसून यासाठी कोणाला जबाबदार ठरवावे, याची विचारणा टिळवे यांनी क्रीडा विभागाच्या वरिष्ठांकडे पत्राव्दारे केली आहे. मात्र, उत्तर अद्यापही
मिळाले नसल्याचे टिळवे यांनी सांगिंतले. (वार्ताहर)