लसीकरणाच्या ऑनलाईन नाेंदणीकरिता अधिकारी डाेंगरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:15+5:302021-07-07T04:38:15+5:30
मंडणगड : ग्रामीण भागात झालेल्या लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करण्यास आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोबाईल नेटवर्कअभावी अनंत अडचणी येत आहेत. एका ...
मंडणगड : ग्रामीण भागात झालेल्या लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करण्यास आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोबाईल नेटवर्कअभावी अनंत अडचणी येत आहेत. एका बाजूला लसीकरण सुरू असताना काही कर्मचारी नेटवर्क मिळेल अशा ठिकाणी रेंजच्या शोधात फिरत आहेत. चक्क त्यासाठी त्यांना डाेंगराचा आधार घ्यावा लागत आहे. लसीकरण व नोंदणी अशी दुहेरी जबाबदारी आता या कर्मचाऱ्यांना पार पाडावी लागत आहे.
तालुक्यात १२,५४० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, ग्रामीण भागात ऑनलाईन नोंदणीचा अडसर येत आहे. लसीकरण अभियानास तालुक्यात गती आलेली असताना शहरी भागातील उत्साह ग्रामीण भागात दिसत नाही. शहरी भागात लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागत असताना ग्रामीण भागात मात्र आरोग्य सेवकांना दारोदारी जाऊन लसीकरण करून घेण्याचे आवाहन करावे लागत आहेत, तर २८८४ नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. मे महिन्यात तालुक्यातील ४५ वर्षांवरील १४ हजार व्यक्तींचे लसीकरण शिल्लक होते. या संदर्भात अधिक माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेली नाही. दुसऱ्या लाटेत तालुक्यात ४ जुलै २०२१ अखेर एकूण ८८४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, ७६६ रुग्ण बरे झाले आहेत.
सद्य:स्थितीत तालुक्यात ११८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभाग विविध माध्यमातून लक्ष ठेवून आहे. ग्रामीण भागात ऑनलाईन नोंदणीत अडचणी येत आहेत. तालुक्यातील तोंडली, पंदेरी, देव्हारे, कुडुक परिसरात मोबाईल रेंजच नसल्याने लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करण्यास आरोग्य सेवकांना अडचण येत आहे. तोंडलीसारख्या गावात लसीकरणावेळी रेंज मिळण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन किलाेमीटर डोंगरावर जावे लागले. नागरिकांचे आधारकार्ड व मोबाईल नंबर टिप्पणी करून रानात बसूनच नाेंदणी करावी लागली.
-------------------------------
मंडणगड तालुक्यातील ग्रामस्थ लसीकरणासाठी केंद्राबाहेर रांगा लावत असून, तर ऑनलाईन नोंदणीसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी ताेंडली येथील डाेंगरावर बसून काम करत आहेत.