रत्नागिरी : अधिकारीच सरकार चालवत आहेत, माणिकराव ठाकरे यांचा चिपळुणात आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:06 IST2018-01-13T10:39:57+5:302018-01-13T11:06:37+5:30
राज्य व केंद्रातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत आहेत. शेतकरी, कामगार, मजूर, उद्योग, सिंचन अशा सर्वच बाबतीत सरकारविरोधात नाराजी आहे. जनता २०१९ची वाट पाहात असून, याचवेळी या सरकारला उत्तर मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नसून, काही अधिकारीच सरकार चालवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे उपसभापती, आमदार माणिक ठाकरे यांनी केला.

रत्नागिरी : अधिकारीच सरकार चालवत आहेत, माणिकराव ठाकरे यांचा चिपळुणात आरोप
चिपळूण : राज्य व केंद्रातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत आहेत. शेतकरी, कामगार, मजूर, उद्योग, सिंचन अशा सर्वच बाबतीत सरकारविरोधात नाराजी आहे. जनता २०१९ची वाट पाहात असून, याचवेळी या सरकारला उत्तर मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नसून, काही अधिकारीच सरकार चालवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे उपसभापती, आमदार माणिकराव ठाकरे यांनी केला.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे चिपळुणात आले असता शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार हुसेन दलवाई, काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विश्वनाथ पाटील उपस्थित होते.
यावेळी ठाकरे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी या सरकारने जी आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीतच, उलट जनतेला आर्थिक खाईत लोटले. त्यामुळे जनता सरकारला धडा शिकवण्याच्या इराद्याने संधीची वाट पाहात आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी गोंधळलेले आहेत.
एकाही आश्वासनाची पूर्तता होत नाही. जूनमध्ये सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, आजही सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. यादीमध्ये मोठा घोळ आहे. आज शेतकऱ्यांना हमीभावाची मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चुकीच्या धोरणामुळे जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही.
शासनाचे अनेक निर्णय चुकीचे ठरले आहेत. जीएसटी, नोटाबंदी, महागाई अशा सर्वच विषयात सरकार फेल झाले आहे. त्यामुळे या सरकारकडे सांगण्यासारखा एकही चांगला विषय नाही. हजारो शाळा बंद करण्याचा घाट या सरकारने घातला आहे. पाटबंधारे प्रकल्प ठप्प झाले आहेत. चुकीचे धोरण यास कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून हे सरकार सत्तेवर आले. मात्र, तीन वर्षात एकही भ्रष्टाचार सरकारने जनतेसमोर आणला नाही, असेही म्हणाले.
उद्धव ठाकरे सोयीने शब्द बदलतात
राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. हे गृहखात्याचे अपयश असून, कोरगाव - भीमाच्या घटनेमध्ये बाहेरच्यांचा हात आहे. त्या दृष्टीने चौकशी व्हायला हवी, असे सांगून सरकारमधील सेनेची भूमिका दुटप्पी आहे. सत्तेत राहण्यासाठी उद्धव ठाकरे सातत्याने सोयीने शब्द बदलतात, असा आरोप त्यांनी केला.