दिशा समितीच्या बैठकीला अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर, खासदारांकडून अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नाराजी
By अरुण आडिवरेकर | Published: November 15, 2022 04:19 PM2022-11-15T16:19:50+5:302022-11-15T17:50:35+5:30
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा दिशा योजनेतून आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती
रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीच्या बैठकीला जाणीवपूर्वक काही अधिकारी गैरहजर राहिल्याने समितीची सभा तहकूब करण्यात आल्याची माहिती खासदार तथा दिशा समितीचे अध्यक्ष विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. आठ वर्षांत प्रथमच ही सभा तहकूब करण्याची वेळ आली आहे.
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा दिशा योजनेतून आढावा घेण्यासाठी मंगळवारी (१५ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला समितीचे अध्यक्ष खासदार विनायक राऊत आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि पार्लमेंटच्या आदेशानुसार दिशा समिती स्थापन करण्यात आली आहे. या दिशा समितीमध्ये केंद्र शासनाच्या विविध प्रकारच्या ४३ समित्यांचा आढावा घेतला जातो. जिल्हाधिकारी हे या समितीचे सचिव आहेत.
जिल्हाधिकारी हे प्रशिक्षणाला गेल्याने ते गैरहजर राहिले. तर अप्पर जिल्हाधिकारी हे मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे खेडमध्ये गेले होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचे अजेंडा तयार करणारे असतात. या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची हजेरीच घेतली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी गैरहजर असल्याचे समोर आले. त्यानंतर ही बैठक तहकूब करण्यात आली.
बैठकीला गैरहजर राहिलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव राज्याच्या सचिवांसह केंद्रातील संबंधित सचिवांना पाठवण्यात आला आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत व खासदार सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.