खेंड येथे पथदीप बसविण्यासाठी अधिकाऱ्यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:31 AM2021-04-24T04:31:08+5:302021-04-24T04:31:08+5:30
अडरे : चिपळूण शहरातील खेंड कांगणेवडी रस्त्याजवळील रसाळचाळ येथे पथदीप बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल ...
अडरे : चिपळूण शहरातील खेंड कांगणेवडी रस्त्याजवळील रसाळचाळ येथे पथदीप बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत, युवासेना विभाग प्रमुख नीलेश भरत आवले यांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन या विषयाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे आवले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे येथे पथदीप बसविण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून, नगरपरिषदेच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.
रसाळचाळ येथील नागरिकांना अंधारातून मार्ग काढावा लागत असल्याने, त्यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे पथदीप बसविण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने पथदीप बसविण्याचे काम गेल्या १२ वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे हे काम मार्गी लावण्यासाठी रसाळचाळीतील रहिवासी व नागरिकांनी खेंड विभागातील युवासेना विभाग प्रमुख नीलेश आवले यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर, तत्काळ नीलेश आवले यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते यांना निवेदन देऊन पथदीप बसविण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेऊन डॉ.वैभव विधाते यांनी पथदीप विभागाचे प्रमुख अमित महाडिक यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार, त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी नीलेश आवले यांच्यासह रहिवासी उपस्थित होते. यावेळी महाडिक यांनी महिन्याभरात रसाळचाळ येथे पथदीप उभारण्याचे आश्वासन दिले होते. अखेर नीलेश आवले यांच्या प्रयत्नामुळे पथदीप बसविण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.